‘इमरजेन्सी’चा ट्रेलर जारी
कंगना रनौतचा महत्त्वाकांक्षी चित्रपट
अभिनेत्री कंगना रनौतचा आगामी चित्रपट ‘इमरजेन्सी’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. निर्मात्यांनी आता याचा ट्रेलर जारी केला आहे. या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. 1975 च्या भारतावर आधारित हा चित्रपट आणीबाणीवर बेतलेला आहे. राजकीय नाट्यात कंगना ही इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसून येते. या चित्रपटात कंगनासोबत अनुपम खेर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहे. श्रेयसने चित्रपटात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. तर दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांनी चित्रपटात माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांची भूमिका साकारली आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली महिला, त्यांच्या इतिहासात लिहिला गेलेला सर्वात काळा अध्याय म्हणजे आणीबाणी असे कंगनाने ट्रेलरच्या कॅप्शनदाखल नमूद केले आहे. कंगनाचा हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगनानेच केले असल्याने तिला या चित्रपटापासून मोठ्या अपेक्षा आहेत.