‘आंखो की गुस्ताखियां’चा ट्रेलर सादर
विक्रांत मैसी अन् शनायाची केमिस्ट्री
विक्रांत मैसी आणि शनाया कपूरचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘आंखो की गुस्ताखियां’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये दोघांच्या प्रेमापासून दूर होण्यापर्यंतची कहाणी दाखविण्यात आली आहे. दोघांच्याही व्यक्तिरेखा परस्परांसोबत सैर करत असतात, परस्परांसोबत चांगले क्षण घालवत असतात, यादरम्यान दोघेही प्रेमात पडतात आणि मग अखेर दोघांच्या नात्यात कटुता येत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. ‘आंखो की गुस्ताखियां’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष सिंह यांनी केले आहे. चित्रपटात विक्रांत मैसी आणि शनाया कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट रस्किन बाँड यांची लघुकथा ’द आइज हॅव इट’वर आधारित आहे. चित्रपटात शनायाने एक थिएटर आर्टिस्टची भूमिका साकारली आहे आणि विक्रांत चित्रपटात एक अंध संगीतकाराच्या भूमिकेत आहे.
शनाया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनायाचा हा चित्रपट 11 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमधील शनायाची झलक पाहून तिचे कौतुक होत आहे. ट्रेलरला सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत.