ऑस्ट्रेलियन युवा क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू
वृत्तसंस्था/मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाचा युवा क्रिकेटपटू 17 वर्षीय बेन ऑस्टीनचा येथे सराव सत्रात मानेवर चेंडू आदळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. 2014 साली ऑस्ट्रेलियाच्या फिलीप ह्युजेसचा मैदानात असाच दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर ऑस्टीनच्या निधनाने या मागील आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
मेलबोर्नमध्ये मंगळवारी नेटमध्ये सराव करत असताना बेन ऑस्टीनच्या मानेवर वेगवान चेंडू आदळला. या क्षणीच तो मैदानावर कोसळला. त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला लागलीच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण वैद्यकीय उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा अखेर मृत्यू झाला.
ऑस्टीन नेटमध्ये सरावामध्ये आपल्याच सहकाऱ्यांच्या वेगवान गोलंदाजीसमोर फलंदाजीचा सराव करीत होता. रुग्णालयात ऑस्टीनला व्हेंटीलिटरवर ठेवण्यात आले होते. पण त्याची ही दुखापत अधिक गंभीर झाल्याने त्याला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. क्रिकेट व्हिक्टोरियाने या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून बेनचे वडील जेस ऑस्टीन व त्यांच्या इतर कुटुंब सदस्यांना या घटनेला सामोरे जाण्याचे सामर्थ्य देवो, अशी प्रार्थना केली.