दोन वर्षांच्या बालकाचा हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू
तिपेहळळी (ता. जत) येथे घडलेली हृदयद्रावक घटना
जत :
जत तालुक्यातील तिपेहळळी येथे शुक्रवारी (दि. २५ जुलै) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. घरासमोर खेळत असताना निशांत निलेश शिंदे (वय २ वर्षे) या चिमुकल्याचा पाण्याने भरलेल्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची सविस्तर माहिती अशी शुक्रवारी दुपारी निशांत घरासमोर खेळत असताना अचानक तोल जाऊन पाण्याने भरलेल्या हौदात पडला. त्यावेळी घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त गावी नव्हती, तर महिला घरकामात व्यस्त होत्या. त्यामुळे बालक पाण्यात पडल्याची कुणालाही कल्पना आली नाही.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत निशांत दिसून न आल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. त्यावेळी घराशेजारी असलेल्या हौदात त्याचा मृतदेह आढळून आला. तात्काळ त्याला जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. निष्पाप बालकाच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.