महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओढवून घेतलेली शोकांतिका

06:30 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॅनडाचे नेते जस्टीन ट्रूडो यांना अखेर पदत्याग करावा लागला आहे. 2015 पासून त्यांच्याकडे कॅनडाचे नेतृत्व होते. दुसरा कार्यकाल पूर्ण करण्याच्या आधीच त्यांना पायउतार व्हावे लागले. त्याच्या लिबरल पक्षात त्यांच्याविरोधात असंतोष वाढीला लागला होता. इतकेच नव्हे, तर ज्या खलिस्तानवादी शीख पक्षाच्या भरवशावर त्यांचे सरकार चालले होते, त्या पक्षानेही पाठिंबा काढून घेतल्याने त्यांच्यासमोर पदत्याग करण्यावाचून गत्यंतर नव्हते. त्यांना त्यांच्या लिबरल पार्टीचे नेतेपदही सोडावे लागले आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्ष यावर्षी होणारी सार्वत्रिक निवडणूक जिंकू शकत नाही, हे दिसून आल्यावर पक्षात त्यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला. अखेर या असंतोषाचे पर्यवसान त्यांच्या पदत्यागात झाले. एकप्रकारे ही त्यांची शोकांतिकाच आहे आणि ते स्वत: या स्थितीला उत्तरदायी आहेत. त्यांचा कॅनडाचा नेता म्हणून झालेला उदय आणि अस्त यांचा भारताशीही संबंध आहे. त्यामुळे त्यांचे जे झाले हे भारतासाठी महत्त्वाचे आहे. भारतातातील पंजाब राज्यातील शीख दहशतवाद आणि फुटीरतावादाला

Advertisement

कॅनडातील काही शीखांनी नेहमीच खतपाणी घातले आहे. पंजाब राज्य भारतातून फोडून स्वतंत्र खलीस्तान राष्ट्राची निर्मिती करणे, हे या दहशतवाद्यांचे ध्येय आहे. या ध्येयाच्या पूर्तीसाठी त्यांनी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला आहे. 80 च्या दशकात पंजाबमध्ये या खलिस्तानवादी हिंसाचाराने कळस गाठला होता. त्यावेळी त्या राज्यात निर्नायकी अवस्था निर्माण होऊन पंजाब खरोखरच भारतातून फुटतो की काय, अशी अवस्था निर्माण झाली होती. अखेर तत्कालीन नेत्या इंदिरा गांधी यांना सुवर्णमंदिरात सेना पाठवून या दहशतवादावर घाव घालावा लागला होता. नंतर इंदिरा गांधी यांची हत्याही त्यांच्या शीख अंगरक्षकांनीच केली होती. एकंदरीतच, ते दशक अत्यंत अस्थिरतेचे आणि भयावह ठरले होते. त्याचवेळी भारतातील या दहशतवादाला आणि फुटीरतावादाला पाकिस्तानकडून सढळ हस्ते साहाय्य पेले जात होते. तर

Advertisement

कॅनडातील काही शीखांचाही पाठिंबा याला होता. भारताने अनेकदा कॅनडाला सजग करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, याच जस्टीन ट्रूडो यांचे पिता पेरी ट्रूडो हे त्यावेळी कॅनडाचे नेते होते. त्यांनी भारताच्या इशाऱ्यांकडे साफ दुर्लक्ष करुन भारतातील दहशतवादाला साहाय्य करणाऱ्या कॅनडातील शक्तींना पाठीशी घातले होते. 90 च्या दशकात भारतातील खलीस्तानवाद मंदावला. हिंसाचारही थांबला. तथापि, कॅनडामध्ये खलिस्तानवादी शीखांना संरक्षण आणि अर्थसाहाय्य मिळत होते. त्यामुळे हा फुटीरतावाद पूर्णत: संपला नाही. पुढे जस्टीन ट्रूडो हे कॅनडाचे नेते झाल्यावर त्यांनी आपल्या पित्याचीच परंपरा पुढे चालविली. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी भारताच्या हितांचा बळी देण्यास मागेपुढे पाहिले नाही. जस्टीन ट्रूडो यांनी नंतर आपल्या पित्याच्याही पुढचे पाऊल उचलून भारताच्या अंतर्गत घडामोडींवरही भाष्य करण्यास प्रारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी जे आंदोलन झाले, त्याला

कॅनडाने पाठिंबा दिला. या आंदोलनात खलीस्तानवादी शक्तींचाही समावेश होता, असा आरोप केला गेला. अशा प्रकारे आपण खलिस्तानवाद्यांची पाठराखण करतो, हे ट्रूडो यांनी उघडपणे दाखवून देण्यासही कमी केले नाही. याच काळात कॅनडात हरदीपसिंग निज्जर नावाच्या खलीस्तानवाद्याची हत्या झाली. या हत्येत भारताच्या प्रशासनाचा हात आहे, असा प्रच्छन्न आरोप ट्रूडो यांनी स्वत: केला. हे पातळी सोडल्याचे लक्षण होते. कारण, अशा घटना घडतात, तेव्हा सहसा एखाद्या देशाचा प्रमुख नेते असे आरोप स्वत:च्या तोंडाने करीत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर ते योग्य मानले जात नाही. पण तेही भान ट्रूडो यांनी ठेवले नाही. भारताने अनेकदा त्यांच्याकडे पुराव्यांची मागणी केली होती. पण आपल्याकडे ठोस पुरावा नाही, हेही ट्रूडो यांनी मान्य केले. याचा अर्थ असा की त्यांनी भारतावर केलेले आरोप हे हेतुपुरस्सर होते. त्यांच्या पक्षाने कॅनडात सत्तेवर राहण्यासाठी शीख दहशतवाद आणि फुटीरतावाद यांची केलेली पाठराखण अखेर त्यांना महागात पडली असल्याचे दिसून येते. कॅनडात त्यांच्या लोकप्रियतेला लागलेल्या घसरणीच्या मागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक कॅनडात फोफावणारा खलीस्तानवाद हे ही आहे. खलिस्तानवादी शक्तींचा फटका कॅनडालाही बसला असून त्या देशात गुन्हेगारीच्या प्रमाणात गेल्या 10 वर्षांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांनाही या वातावरणाचा त्रास होत आहे. पाकिस्तानने भारताचे हात पिरगाळण्यासाठी आपल्या भूमीवर दहशतवाद पोसला आणि नंतर तोच दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानवरच उलटला. आज पाकिस्तान स्वत:च दहशतवादाच्या या आगीत होरपळून निघताना दिसतो. अगदी तितक्या प्रमाणात नाही, पण खलीस्तानवादाच्या संबंधात कॅनडाची स्थिती ट्रूडो यांच्या नेतृत्वात तशीच झाली असल्याचे दिसून येते. ‘जे लोक, शेजाऱ्यांना चावावेत म्हणून स्वत:च्या परसात साप पाळतात, ते साप त्यांनाही चावतात’ असे विधान अमेरिकेच्या माजी परराष्ट्रव्यवहार मंत्री हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानसंदर्भात केले होते. तेच विधान तितक्या तीव्रतेने नव्हे, पण काही प्रमाणात ट्रूडो यांच्यासाठीही लागू पडते. आता त्यांना पद सोडावे लागले आहे. त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले. या सर्व प्रकरणावरुन धडा हाच, की राजकीय स्वार्थासाठी कोणत्या मार्गाने किती पुढे जायचे, याची मर्यादा पाळली नाही, तर शेवटी परिणाम अनपेक्षित होतो.

कॅनडातील ज्या खलिस्तानवादी एनडीपी पक्षावर विसंबून राहून ट्रूडो यांनी भारताशी उभा दावा मांडला, तो पक्षही त्यांच्या पडत्या काळात त्यांच्यासमवेत राहिला नाही. प्रत्यक्ष त्यांच्या लिबरल पक्षातही आता त्यांचे सहानुभूतीदार फारसे राहिलेले नाहीत. हे सर्व होण्याची खरेतर आवश्यकता नव्हती. पण, काही मर्यादांचे भान सुटल्याने त्यांच्यावर अशी वेळ आली, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आज त्यांना ज्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे, ती त्यांनी स्वत: स्वत:वर ओढवून घेतली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article