सर्वाधिक उष्ण 2024 वर्ष
जागतिक तापमानवाढीचे संकट आज संपूर्ण जगभर प्रकर्षाने जाणवत असून, त्याचे असह्याकारक चटके वर्तमान आणि आगामी काळात आणखी तीव्रतेने जाणवण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. मानवी समाजाने औद्योगिकरण, नागरीकरणासाठी विकासाचे जे असंख्य प्रकल्प पर्यावरण, जंगल आणि एकंदर परिसंस्थेला संकटग्रस्त करीत हाती घेतलेले होते, त्यांनी वारेमाप कर्बवायुचे उत्सर्जन करण्यालाच प्राधान्य दिल्याने तापमान वाढीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. आपण 2024 या वर्षाला निरोप देऊन, 2025चे स्वागत मोठ्या आनंदाने आणि आशावादी दृष्टिकोनातून केलेले आहे. 2024 हे वर्ष भारताच्या हवामानाच्या नोंदीनुसार इतिहासात 1901 नंतरचे सर्वाधिक उष्ण असल्याचे स्पष्ट झालेले आहे. आजच्या घडीस काश्मिरसह उत्तर भारत आणि परिसरात थंडी अगदी तीव्रपणे जाणवत असली तरी देशाच्या काही भागात गारवा कमी होऊन दिवसा उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार भारताच्या हवामानच्या इतिहासात 1901 नंतरचे सर्वाधिक उष्ण 2024 हे वर्ष ठरलेले आहे.
मागच्या वर्षभरात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सरासरी तापमानात 0.83 अंश सेल्सिअस एवढी अभूतपूर्व वाढ झालेली असून, जुलै आणि सप्टेंबर हे महिने गेल्या 123 वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उष्ण होते तर सर्वाधिक उष्ण म्हणून ऑक्टोबरची नोंद झालेली आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागरावरील सामान्यापेक्षा जास्त तापमानाशी संबंधित जागतिक महासागरीय घटना ठरलेल्या ‘अल निनो’च्या एकंदर प्रभावाखाली 2024 या वर्षाचा प्रारंभ झाला होता. पावसाळ्यात हे प्रवास तटस्थ स्थितीत बदलले, परंतु शीत हवामानाला कारण असणाऱ्या ‘निना’च्या प्रवाहाच्या निर्मितीला उशीर झाला. त्यामुळे तापमानवाढीला चालना मिळून हवामानविषयक दुष्परिणामांत विलक्षण वृद्धी झाली आणि त्यामुळे एप्रिल ते जून या कालखंडात देशाच्या बऱ्याच मोठ्या भागात उष्माघाताचे असह्याकारक चटके जाणवले. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये सलग पंधरवडा एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना इस्पितळात दाखल होण्याची वेळ आली तर कडाक्याच्या थंडीच्या मोसमाची जागतिक पातळीवरती घट झाली. गेल्या काही वर्षांच्या तापमानाकडे लक्ष दिले तर गेल्या पंधरा वर्षात 2001, 2010, 2016, 2017 आणि 2024 ही पाच वर्षे सर्वाधिक उष्ण वर्षे म्हणून नोंद झाली. जागतिक स्तरावरती 2024 हे वर्ष सर्वांत उष्ण ठरण्याची शक्यता आहे. जागतिक तापमान वाढीमुळे गेल्या वर्षी 3700 जण मृत्युमुखी पडल्याचे आणि असंख्य संसार उघड्यावर पडल्याचे प्रसिद्धीस आलेल्या नव्या अहवालानुसार स्पष्ट झालेले आहे. जागतिक पातळीवरती वर्तमान आणि आगामी काळात तापमान वाढीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सामूहिकरित्या प्रयत्नांची नितांत गरज आहे.
भारतात एकूण हरितगृह वायू उत्सर्जनात 2019च्या तुलनेत 2020 साली 7.93 टक्क्यांनी घट झालेली असून एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार तीव्रता प्रतियुनिट कर्बवायू उत्सर्जन 2005 ते 2024 या कालखंडात 36 टक्क्यांनी कमी झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. 2024 मधील तापमान वाढीचा कल 2025 सालीसुद्धा कायम राहण्याचा अंदाज आहे. जागतिक तापमानवाढीच्या संकटाच्या तीव्रतेपायी पूर, वादळ आणि दुष्काळाच्या समस्या जगभर वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. हवेतील पाण्याची वाफ, कर्बवायू, मिथेन व इतर वायूच्या उत्सर्जनामुळे भूपृष्ठ आणि वातावरणाच्या शेवटच्या स्तरावर तापमान वृद्धी होते. सूर्यापासून येणारा बहुतेक सर्व दृश्य प्रकाश वातावरणातून भूपृष्ठावर पडतो. सूर्यप्रकाशाने भूपृष्ठ तापते आणि यापैकी काही ऊर्जा अवकाशात राहते, जी हरितगृह वायूद्वारे शोषली जाते आणि यामुळे तापमान वाढ जाणवू लागते. खरेतर हरितगृह परिणाम हा नैसर्गिकरितीने घडत असला तरी, मानवी समाजाच्या आततायी व्यवहारामुळे वातावरणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन होऊन हरितगृह दुष्परिणाम प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंतच्या काळात वातावरणातील कर्बवायूचे उत्सर्जन 30 टक्क्यांनी वाढलेले असून, त्यात मिथेन वायूचे उत्सर्जन दुप्पटीपेक्षा ज्यादा वाढल्याचे स्पष्ट झालेले आहे. पृथ्वीच्या संपूर्ण इतिहासात तिचा पृष्ठभाग सावकाशपणे तापण्याचे व थंड होण्याचे अनेक कालखंड होऊन गेल्याचे स्पष्ट झालेले आहे. ज्वालामुखी उद्रेक, सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेत झालेले फेरबदल आदी कारणांमुळे हे नैसर्गिकरितीने घडले आहे.
तापमान वाढीच्या संकटात वाढत्या औद्योगिकरणामुळे आणि मानवी समाजाच्या आततायी कृत्यांमुळे वृद्धी झाल्याचे संशोधकांचे मत आहे आणि त्यामुळे निसर्गातल्या मोसमी फुले येणे, अंडी घालणे, स्थलांतर करणे, पालवी फुटणे या नैसर्गिक प्रक्रियेच्या वेळेत बदल झालेला आहे. ऑस्ट्रेलियात फ्लाईंग फॉक्स नावाची वटवाघुळे दक्षिणेकडील अधिक थंड भागाकडे स्थलांतरित झाली. तापमान वाढीशी जुळवून घेणे बऱ्याच सजीवांच्या प्रजातींना कठीण ठरू लागलेले आहे. बर्फावर शिकार करून जगणारी ध्रुवीय अस्वले आणि बर्फावर पिल्लांना जन्म देणारे सील अशा बऱ्याच जीव-जातींना धोका निर्माण झालेला आहे. उच्च सागरी तापमानांमुळे आज प्रवाळांच्या आत राहणारी व त्यांना अन्न पुरविणारी रंगीत शैवले नष्ट झाल्याने, प्रवाळ पांढरे होऊन, मरू लागले आहेत. त्यामुळे प्रवाळावरती अवलंबून असणाऱ्या बऱ्याच प्राण्यांचे जगणे संकटग्रस्त होणार आहे.
जागतिक तापमान वाढीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी जीवाश्म इंधनांच्या आततायी वापरावरती नियंत्रण प्रस्थापित करण्याबरोबर सूर्यप्रकाश, वारा आदी ऊर्जास्रोतांच्या वापराला प्राधान्य देण्याची गरज आहे. वाहने, जैवइंधने व इंधन विद्युत घट विकसित करण्यावरती भर दिला पाहिजे. गरज नसताना विजेच्या दिव्यांचा वापर टाळणे, कमी ऊर्जा लागणारे दिवे वापरणे, स्वयंचलित वाहनांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविण्यासाठी उपाययोजना करणे आदी पर्यायांवर विचार आणि कृती महत्त्वाची ठरलेली आहे. महानगरातील वाढते प्रदूषण ऐरणीवर असताना, आज छोट्या शहरांतील प्रदूषण वाढत चालले आहे. उन्हाळ्यात लागणाऱ्या जंगलांतल्या वणव्याचा कृषी क्षेत्रालाही सध्या मोठा फटका बसत आहे. 2020 साली कोविड-19 मुळे प्रतिबंधात्मक उपायांमुळे पृथ्वीवर उष्णता निर्माण करणाऱ्या उत्सर्जनात 7 टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाले होते परंतु प्रदुषणाची मात्रा कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. सजीव मात्रांसाठी आज तापमान वाढीमुळे पृथ्वी दिवसेंदिवस तापदायक ठरत असल्याने त्याला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक परिस्थितीला पोषण ठरणाऱ्या वृक्षवेलींनी युक्त जंगलाच्या निर्मितीबरोबर शेकडो वर्षांची परंपरा असणारी वने सुरक्षित आणि संवर्धन करणे महत्त्वाचे आहे, हे आम्ही प्रत्यक्ष कृतीत आणले पाहिजे.
- राजेंद्र पां. केरकर