For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुन्या बसस्थानकापर्यंत बसेस सोडण्याच्या मागणीसाठी रास्तारोको

11:33 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
जुन्या बसस्थानकापर्यंत बसेस सोडण्याच्या मागणीसाठी रास्तारोको
Advertisement

आश्वासनानंतर आंदोलन शुक्रवारपर्यंत स्थगित  

Advertisement

खानापूर : येथील जुन्या बसस्थानकापर्यंत गेल्या दोन महिन्यांपासून बेळगावसह इतर ठिकाणी जाणाऱ्या बसेस येण्याचे बंद झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बस जुन्या बसस्थानकापर्यंत सोडाव्यात, या मागणीसाठी खानापुरातील नागरिकांकडून मंगळवारी सकाळी राजा छत्रपती चौकात रास्तारोको आंदोलन हाती घेण्यात आले होते. आंदोलन सुरुवात होण्यापूर्वीच बसआगार उपव्यवस्थापक विठ्ठल कांबळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदनाचा स्वीकार केला. आणि सर्व बसेस जुन्या बसस्थानकापासून सोडण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला. जर बसेस जुन्या बसस्थानकापर्यंत सोडण्यात आल्या नसल्यास पुन्हा शुक्रवारी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जुन्या बसस्थानकापासून बेळगाव, जांबोटी, कणकुंबी भागात जाणाऱ्या बसेस येण्याचे बंद झाले असून या सर्व बसेस नव्या बसस्थानकापासून सोडण्यात येत आहेत. तसेच परतीच्या बसही जुन्या बसस्थानकापर्यंत येत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार मागणी करून तसेच अर्ज, विनंत्या करूनदेखील बस व्यवस्थापकांनी याची दखल घेतली नव्हती. यासाठी शनिवारी बस आगार प्रमुखांची भेट घेऊन मंगळवारी रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आगारप्रमुखांनी या इशाऱ्याची दखल न घेता बसेस नव्या बसस्थानकावरून सोडण्यात येत होत्या. यामुळे खानापूर शहर तसेच सर्वपक्षीय नागरिकांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता राजा छत्रपती चौकात रास्तारोको आंदोलन हाती घेतले.

Advertisement

यावेळी भाजपचे संजय कुबल, पंडित ओगले, म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाण, प्रतीक देसाई, राजेंद्र रायका, बाळाराम सावंत, नारायण ओगले, चर्मकार संघटनेचे पुट्टू हावनूर, लोकेश कणबर्गी, दिलीप सोनटक्के, प्रकाश देशपांडे, रवी काडगी, गुंडू तोपिनकट्टी यासह शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन सुरू होण्याअगोदरच बस आगाराचे उपव्यवस्थापक विठ्ठल कांबळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून बुधवारपासून सर्व बसेस जुन्या बसस्थानकापासून सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शुक्रवारपर्यंत स्थगित केले. सर्व बसेस जुन्या बसस्थानकापासून न सोडल्यास शुक्रवारी आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याचे उपस्थितांकडून जाहीर करण्यात आले.

Advertisement
Tags :

.