काकतीवेस रोडवर ट्रॅफिक समस्या नित्याचीच
बेळगाव : शहरात ट्रॅफिकची समस्या नित्याचीच बनली आहे. मंगळवारी जि. पं. कार्यालयासमोर मोठा ट्रॅफिक जाम झाल्याचे दिसून आले. जवळवळ 10 ते 15 मिनिटे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. या परिसरात अनेक जिल्हास्तरीय कार्यालये, न्यायालय आहे. यामुळे याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते. यामुळे हा मार्ग नागरिक व वाहनांनी गजबजलेला असतो. मात्र ट्रॅफिक जाम झाल्याने रहदारीस अडथळा निर्माण होतो. वारंवार होत असलेल्या ट्रॅफिकच्या समस्येची दखल घेऊन पोलीस खात्याने पावले उचलण्याची गरज बनली आहे.
काकती वेस रस्त्यावर न्यायालय, जिल्हाधिकारी, उपनोंदणी, ता. पं., जि. पं., लोकायुक्त, सीईन पोलीस स्थानक यासह इतर अनेक सरकारी कार्यालये आहेत. याठिकाणी दररोज हजारो लोकांची ये-जा होत असते. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. जिल्हाधिकारी परिसरात नागरिक आपली वाहने पार्क करून आपले काम आटोपण्यासाठी जातात. मात्र वाहने रस्त्यावरच पार्क करून जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यामुळे मार्गक्रमण करताना समस्या होते. यासाठी पोलीस खात्याने रस्त्यावरील वाहने हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्याची मागणी होत आहे.