ट्राफिक पोलीस ‘तालांव’चे टार्गेट पूर्ण करण्यात मग्न
आमदार मायकल लोबो यांची सरकारवर टीका, अपघातांत वाढ, तालांव देऊन अपघात कमी होणार नाही, मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे
म्हापसा : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. मात्र याची जबाबदारी घ्यायला कुणीही पुढे येत नाही. येथील ट्राफिक पोलीस वाहनधारकांना चलन देण्यात मग्न असतात. विशेष म्हणजे चलन देण्यासाठी पोलिसच नो एन्ट्रीमध्ये उभे रातात. टार्गेट पूर्ण करण्यासाठीच ते फिरतात. इतरत्र त्यांचे कुठेच लक्ष नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे याबाबत बोलणी करणार आहे. तसेच अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित करणार आहे. चलन देऊन अपघात कमी होणार नाहीत असे ठोस मत आमदार मायकल लोबो यांनी वाढत्या अपघातांबाबत घेण्याच्या जबाबदारीबाबत दै. तऊण भारतशी बोलताना व्यक्त केले.
पोलीस अचानक वाहनासमोर येतात
बहुतेक ठिकाणी ट्राफिक पोलीस नो एन्ट्री, हमरस्त्याच्या मधोमध, रस्त्याच्या आडोशाला लपून राहतात. गाडी आल्यावर अचानक पुढे येतात. त्यामुळे ब्रेक लावल्यानंतर दुचाकीस्वार रस्त्यावर पडतात. तसेच मागून येणारे वाहनही ठोकर देण्याची शक्यता असते. अशा तक्रारी आपल्याजवळ आल्या आहेत. त्यामुळे ट्राफिक पोलिसांनी अचानक रस्त्यावर येऊन वाहन थांबविणे बंद करावे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांशी चर्चा करावी, असे लोबो म्हणाले.