भरणेतील नव्या जगबुडी पुलावरील वाहतूक बंद! एका मार्गिकेचा पूल मध्यभागी उखडल्याचा परिणाम
दोन्ही मार्गावरील वाहतूक एकाच पुलावरून
खेड प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर भरणे येथील नव्या जगबुडी पुलावरील एका मार्गिकेचा भाग मध्यभागी उखडल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद केली आहे. दोन्ही मार्गावरील वाहतूक एकाच पुलावरून सुरू ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून पुलाची पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. पुलावरील वाहतूक पूर्ववत होण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
उखडलेल्या मार्गावरून वाहतुकीस धोका निर्माण झाला असल्याची बाब निदर्शनास येताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी रविवारी रात्री तातडीने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. पुलाच्या उखडलेल्या मार्गाबाबत राष्ट्रीय महामार्ग खात्याशी पोलीस यंत्रणेने संपर्क साधून बाब निदर्शनास आणून दिली आहे. सद्यस्थितीत जगबुडी नदीवरील दोन्ही मार्गावरील वाहतूक एकाच पुलावरून सुरू आहे. नव्या जगबुडी पुलावरील वळणावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक सुरू असलेल्या पुलावरील उतारावर एका बाजूने बॅरिगेटस् लावत वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना वाहनचालकांना करण्यात आल्या आहेत.