राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प
आंदोलनाचा परिणाम : वाहनचालकांमधून नाराजी
बेळगाव : पंचमसाली समाजाच्या आंदोलनामुळे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल तासभर ठप्प होती. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. सुरक्षेसाठी शहरापासून काही अंतरावर महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. या आंदोलनामुळे महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांचे मात्र हाल झाले. आरक्षणाच्या मागणीसाठी पंचमसाली समाजाचे आंदोलन मंगळवारी सुवर्ण विधानसौधसमोर सुरू होते. परंतु दुपारनंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून महामार्गाचा ताबा घेण्यात आला.
तसेच सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न झाला. यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने महामार्गावरील वाहतूक बराच काळ रोखण्यात आली. सुवर्ण विधानसौध प्रवेशद्वार परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पुण्याहून बेंगळूरच्या दिशेने जाणारी वाहने बेळगाव शहरालगत थांबविण्यात आली. तर हुबळीहून बेळगावच्या दिशेने येणारी वाहतूकही के. के. कोप्पजवळ रोखण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी वाहतूक रोखली. त्याचबरोबर शहरातून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारे रस्तेही बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले. यामुळे जुने बेळगाव सर्कल येथे वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. जुने बेळगाव नाक्यापासून टिचर्स कॉलनी कॉर्नरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
नागरिकांना आंदोलनाचा फटका
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आंदोलनाचा फटका बसला. तासभर महामार्गावरील वाहतूक थांबविल्याने वाहने अडकून पडली होती. यामुळे वाहनचालकांनी संतापही व्यक्त केला. निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी विलंब होत असल्याने नाराजीही व्यक्त केली. परंतु पोलिसांनी वाहने पुढे सोडण्यास नकार दिल्याने वाहनचालकांना नाईलाजास्तव थांबावे लागले.