For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरील वाहतूक कोलमडली

11:12 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
जांबोटी खानापूर राज्य महामार्गावरील वाहतूक कोलमडली
Advertisement

सुमारे पाच तास वाहतूक ठप्प : रस्त्याची झाली चाळण : आठवड्याभरात तीनवेळा वाहतूक ठप्प : वाढत्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याचे वाजले बारा

Advertisement

वार्ताहर/जांबोटी

जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावर सुरू असलेल्या वाढत्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून, शुक्रवारी सकाळी पुन्हा विजयनगर-गवळी वाडानजीक रस्त्यावरील खड्ड्यात ट्रक रुतल्याने सुमारे पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. ऐन गणेशोत्सवाच्या काळातच आठवड्याभरात तीनवेळा या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसापासून गोवा-जांबोटी-खानापूर अशी मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे या भागातील नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या वाहतुकीमुळे जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाची अक्षरश: वाताहत झाली आहे. महिन्याभरापूर्वी सुस्थितीत असलेल्या या रस्त्याची चाळण झाली आहे.

Advertisement

रोज ये-जा करणाऱ्या शेकडो 14 चाकी अवजड वाहनांमुळे या रस्त्याचा पूर्णपणे बोजावारा उडाला आहे. या रस्त्याची रुंदी केवळ 3.5 मीटर असल्याने या रस्त्यावर केवळ हलक्या स्वरूपाच्या मालवाहतूक व प्रवासी वाहनांना परवानगी आहे. मात्र महिनाभरापूर्वी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्यावरून अवजड वाहतुकीला परवानगी दिली होती. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या भारामुळे हा रस्ता पूर्णपणे खचल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वाहने अडकण्याच्या घटना वारंवार घडत घडत आहेत.

जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. बससेवेसह इतर प्रवासी वाहतूक देखील ठप्प होत असल्यामुळे या भागातील प्रवासी व विद्यार्थीवर्गाचे अतोनात हाल होत आहेत. चालू आठवड्यात शंकरपेठ चढतीला अवजड वाहतूक करणारा ट्रक दोनवेळा अडकल्यामुळे दिवसभर वाहतूक ठप्प झाली होती. तसेच शुक्रवारी सकाळी देखील जांबोटीनजीक रस्त्यावरील खड्ड्यात पुन्हा ट्रक रुतल्यामुळे हा रस्ता दुपारपर्यंत वाहतुकीसाठी बंदच होता. जांबोटी-खानापूर हा रस्ता अरुंद व घाट वळणाचा असल्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहतूक करणे अत्यंत जिकीरीचे असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक त्वरित बंद करावी, अशी मागणी प्रशासनाकडे अनेकवेळा करूनदेखील त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे, नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.