महामार्गावर तीन कोटींचा दरोडा
पिस्तूल दाखवत रक्कम असलेली कार पळविली : चार महिन्यांतील दुसरी घटना
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कार अडवून 3 कोटी 10 लाख रुपये पळविण्यात आले. कारमधील लोकांना पिस्तूल दाखवित दरोडेखोरांच्या एका टोळीने रोकड असलेली कारच पळविल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून निपाणी ते संकेश्वर दरम्यान हा प्रकार घडला आहे. चार महिन्यांपूर्वी कित्तूरजवळ कार अडवून दहा लाख रुपये पळविण्यात आले होते. या घटनेनंतर शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी तवंदी घाट ते हरगापूर या दरम्यान कारमधील कोट्यावधी रुपये पळविण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद निपाणी पोलीस स्थानकात करायची की संकेश्वर पोलीस स्थानकात करायची यासंबंधी चर्चा सुरू होती. कोल्हापूरमधून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून केरळकडे जाणाऱ्या एका कारमध्ये तीन कोटी दहा लाख रुपये रक्कम होती. अज्ञातांनी ही कार महामार्गावर अडविली.
रक्कम घेऊन जाणाऱ्या कारमध्ये चौघे जण बसले होते. त्यांना पिस्तूल दाखवून धमकाविण्यात आले. त्या चारही जणांना कारमधून खाली उतरवून दरोडेखोरांनी रक्कम असलेली कार पळविली आहे. संबंधितांनी सुरुवातीला या प्रकरणी निपाणी पोलिसांना माहिती दिली. ही घटना आपल्या हद्दीत झाली नाही, संकेश्वर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे संकेश्वर पोलीस स्थानकात येऊन पोलीस अधिकाऱ्यांना यासंबंधी माहिती देण्यात आली. शुक्रवारी रात्री संकेश्वर पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता, तक्रार घेऊन काही जण पोलीस स्थानकात आले आहेत, या तक्रारीची खातरजमा करण्यात येत आहे. ही घटना तवंदी घाटाजवळ घडली आहे की हरगापूरजवळ याची पडताळणी करण्यात येत आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. यासंबंधी पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
चार महिन्यांनंतर...
चार महिन्यांत दरोड्याची दुसरी घटना घडली आहे. 30 जून 2024 रोजी सकाळी कित्तूरजवळ पुणे-बेंगळूर महामार्गावर कार अडवून 10 लाख रुपये पळविण्यात आले होते. या कारमध्येही कोट्यावधी रुपये होते. प्रत्यक्षात 10 लाखाची फिर्याद दाखल करण्यात आली होती. घटनेनंतर एक महिन्यांनी 30 जुलै रोजी उत्तरप्रदेशमधील मथुरा येथे चौघा जणांना अटक करण्यात आली होती. मथुरा पोलिसांच्या गोळीबारात दोन दरोडेखोर जखमी झाले होते. या घटनेनंतर शुक्रवारी महामार्गावर आणखी एक दरोड्याची घटना घडली आहे.