गवंडाळी-जुने गोवे रस्त्यावरील वाहतूक उद्यापासून बंद
गवंडाळी येथे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात
प्रतिनिधी/ पणजी
गवंडाळी ते जुने गोवे मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय म्हणून गोवा राज्य पायाभूत विकास महामंडळाने गवंडाळी येथे नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे काम जोरात सुरू केल्यामुळे येत्या सोमवारी 23 जूनपासून गवंडाळी ते जुने गोवा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी दिली.
आमदार फळदेसाई यांनी सांगितले की, गवंडाळी येथे प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल होणार असल्याने या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे. सोमवार 23 जूनपासून जुने गोवे येथील फिशरमन ट्रेनिंग सेंटरपासून ते धेंपो फुटबॉल मैदानापर्यंतचा रस्ता काही महिन्यांसाठी वाहतुकीस बंद असणार आहे, त्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.
माशेल, सांखळी, डिचोली, बेळगावकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, या मार्गावरील वाहतूक बाणस्तारीमार्गे किंवा खोर्ली औद्योगिक वसाहतीमार्गे वळविण्यात येणार आहे. गवंडाळी रेल्वे उ•ाण पुलाचे काम सुरू असताना नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. कारण हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी, जीएसआयडीसीचे अधिकारी आणि राज्य प्रशासन कटिबद्ध आहे, असेही कुंभारजुवेचे आमदार फळदेसाई यांनी सांगितले.