बालिंगा पुलावरील वाहतूक आज रात्री 9 नंतर होणार बंद ! पाणी धोकापातळी पर्यंत गेल्याने प्रशासनाचा निर्णय
कोल्हापूर/ प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. 2, कोल्हापुर या विभागाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी (कोल्हापूर-बालींगे-कळे-साळवन-ते गगनबावडा) या रस्त्याच्या किमी 79/500 (बालींगे -भोगावती नदी) येथील अस्तित्वातील जुन्या दगडी कमानी पुला खालून वाहणाऱ्या पूराच्या पाण्याची पातळी धोका पातळी पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहीती राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता आरबी शिंदे यांनी दिली आहे.
पुढील काही दिवसांच्या हवामान खात्याच्या अंदाजवरुन जिल्ह्यात पाणी-पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे, या परिस्थीतीचा विचार करुन रस्ते वाहतुक सुरक्षित ठेवणे व पुढील वित्त व जिवित हानी थांबविण्यासाठी बालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र.2 चे उपअभियंता आर. बी. शिंदे यांनी दिली आहे.
पुराच्या पाण्याची पातळी धोका पातळीपासून खाली पोहोचेपर्यंत या पुलावरुन वाहतुक बंद करण्यात येत आहे. या वाहतूक निर्बंधातून अत्यावश्यक सेवा, दुध, वैद्यकीय सेवा यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाला स्थानिक नागरिक व या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी शासनास सहकार्य करावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.