शहर परिसरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली आहे. विविध सजावटीच्या खरेदीला उधाण आले असून शहर परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू आहे. सोमवारी भेंडीबाजार व मेणसी गल्ली सर्कलमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. शहर पोलिसांकडून धर्मवीर संभाजी महाराज चौकात बॅरिकेड्स लावून वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. परिणामी बाजारपेठा नागरिकांनी हाऊसफुल्ल झाल्याचे पहावयास मिळत आहे.
गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. यामुळे सध्या घराघरांत बाप्पाच्या स्वागताच्या तयारीची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवासाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य दाखल झाले आहे. त्यामुळे खरेदीला उधाण आले असून नागरिक बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. ग्रामीण भागासह शहर, उपनगरांतील नागरिक खरेदीसाठी दाखल होत आहेत. यामुळे वाहनांची वर्दळ वाढली असून रहदारीस अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी पोलिसांकडून वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात येत आहेत.
गणपत गल्ली, पांगुळ गल्लीतील बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. सजावटीसह गणरायाच्या स्वागतासाठी विविध साहित्य खरेदीला उधाण आल्याचे पहावयास मिळाले. गणरायाच्या आगमनाला काही तासच राहिले आहेत. यामुळे रंगीबेरंगी तोरण, मकर, विविध प्रकारचे हार, आसन, रुद्राक्ष माळ, रेडिमेड फेटा, रेडिमेड फुलांचे हार आदी साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा नागरिकांनी हाऊसफुल्ल झाल्या. परिणामी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचेही दिसून आले.
धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्लीत मुख्य बाजारपेठा असल्याने याठिकाणच्या रस्त्यांवर सतत वर्दळ असते. गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने पोलिसांकडून धर्मवीर संभाजी महाराज चौकात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना वळसा घालून बाजारपेठेत दाखल व्हावे लागले. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बेरिकेड्स लावण्यात आले असले तरी नागरिकांवर याचा काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले.
त्याचबरोबर सोमवारी दिवसभर भेंडीबाजार व मेणसी गल्लीतही नागरिकांची साहित्य खरेदीला मोठी गर्दी झाली होती. नागरिक मिळेल त्या जागी आपली वाहने पार्क करून खरेदी करत होते. मात्र काही वाहने रस्त्यावर असल्याने बहुतांश नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तसेच मार्गक्रमण करताना वाहने पुढे काढणेही मुश्कील झाले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीला उधाण आले असून कोट्यावधींची उलाढाल करण्यात येत आहे.