शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच
बेळगाव : शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. यामुळे नागरिकांना वारंवार समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिक आपली वाहने अस्ताव्यस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा पार्क करत असल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे. नागरिकांनी योग्यरित्या वाहन पार्क केले तर वाहतुकीसाठी रस्ता खुला राहतो. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. रविवारी सायंकाळी रामलिंगखिंड गल्लीसह इतर मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे नागरिकांना मार्ग काढताना कसरत करावी लागल्याचे दिसून आले. पोलीस प्रशासनानेही याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आपल्या विविध कामांसाठी नागरिक बाजारपेठेत जात असताना दुचाकी व चार चाकी घेऊन फिरत असतात. आपले काम आटोपण्यासाठी नागरिक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त पार्क करतात. यामुळे रस्ता अडवला जात असल्याने वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. नागरिकांनी आपली वाहने रस्त्याकडेला व्यवस्थित पार्क करणे आवश्यक आहे, जेणेकरून नागरिकांना वाहतूक कोंडीविना मार्गक्रमण करता येणार आहे.
शहरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. बाजारपेठेत एखादे मोठे वाहन आले की वाहतूक कोंडी झालीच म्हणून समजा. गेल्या काही दिवसांपासून शहरात पाऊस पडत आहे. यातच वाहतूक कोंडी झाल्यास सर्वांवर त्याचा परिणाम होतो. प्रसंगी वादावादीच्या घटनाही घडत आहेत. यामुळे नागरिकांनी आपली वाहने रस्त्याकडेला व्यवस्थित पार्क करणे आवश्यक आहे. पोलीस दलानेही वाहतूक केंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.