मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी!
मतदानासाठी चाकरमानी गावी आल्याचा परिणाम : खेड पोलिसांकडूनही वाहनांची तपासणी
खेड : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेसाठी चाकरमानी मंगळवारी सायंकाळपासूनच खासगी वाहनांसह आराम बसद्वारे गावी डेरेदाखल झाले. महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने महामार्ग वाहतूक कोंडीत अडकला. यामुळे प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागला. येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रात्रीच्या सुमारास महामार्गावर प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने महामार्गावरून धावणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांसह वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागत आहे. इंदापूर, माणगाव, महाडनजीक चौपदरीकरणातील सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यात मंगळवारी सायंकाळपासून महामार्गावर वाढलेल्या संख्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला.
बुधवारी मतदान प्रक्रियेसाठी चाकरमानी खासगीसह आराम बसद्वारे गावी डेरेदाखल झाले. यामुळे महामार्ग पुरता वाहनांच्या रेलचेलीने गजबजला आहे. पेण, कोलाड, माणगाव, इंदापूरदरम्यान, झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना विलंबाच्या प्रवासाला सामोरे जावे लागले. वाहतूक सुरळीत करताना महामार्गावर तैनात वाहतूक पोलिसांची दमछाक झाली. येथील पोलिसांनीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावी आलेल्या प्रत्येक वाहनांवर करडी नजर ठेवत वाहनांची कसून तपासणी केली.