For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर रहदारीची कोंडी

10:16 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव वेंगुर्ले मार्गावर रहदारीची कोंडी
Advertisement

लग्नसराई,  यात्रा, जत्रांमुळे नेहमीची वर्दळ : रस्त्याचे दुपदरीकरण करण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर /उचगाव

बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगाव ते कर्नाटक महाराष्ट्र सरहद्द शिनोळीपर्यंतच्या महामार्गावर सध्या सुरू असलेल्या लक्ष्मीयात्रा, लग्नसराई आणि नेहमीची वर्दळ यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून प्रवासी वर्गाची कुचंबणा होत आहे. यासाठी या रस्त्याचे दुपदरीकरण तातडीने होणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी वर्गातून आणि ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. बेळगावला तीन राज्ये जोडली गेली आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशा तीन राज्यातील वाहतूक या बेळगाव ते वेंगुर्ला मार्गावरून सातत्याने होत असते. तसेच कोवाडमार्गे कोल्हापूर, गडहिंग्लज, आजरा या भागाकडे जाणारी तर बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावरून सावंतवाडी, कुडाळ, रत्नागिरी, वेंगुर्ला, देवगड अशा भागात जाणारी तसेच गोव्याकडे जाणारी यामुळे या रस्त्यावर सातत्याने रहदारी दिसून येते. यासाठी या रस्त्याचे दुपदरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.

Advertisement

गेल्या अनेक वर्षापासून या भागातील जनतेची आणि प्रवासी वर्गाची ही मागणी आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. बाची-रायचूर असा हा महामार्ग आहे. मात्र ज्या वेळेला बाची-रायचूर या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले. त्यावेळी बेळगाव-रायचूर एवढाच पट्टा करण्यात आला आणि बेळगाव-बाची हा पंधरा किलोमीटर अंतराचा पट्टा तसाच सोडण्यात आला. यामुळे सध्या या रस्त्यावर रहदारीची कोंडी होत आहे. याबरोबरच बेळगाव ते शिनोळी महाराष्ट्र कर्नाटक सरहद्दीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मंगल कार्यालये असल्याने या मंगल कार्यालयात होणाऱ्या लग्न समारंभ याचबरोबर इतर छोटे मोठे कार्यक्रम यामुळे सातत्याने या मंगल कार्यालयाच्या आवारात रस्त्यावर पार्किंग आणि इतर ये-जा करणाऱ्या वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असते. तसेच अनेक गावे ही रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली असल्याने अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटल्याने सातत्याने या भागात गर्दी दिसून येते. तसेच हॉटेल, धाबे यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे पार्किंगची व्यवस्था रस्त्याच्या दुतर्फा असल्याने सातत्याने या ठिकाणी गर्दी दिसून येते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. यासाठी शासनाने तातडीने लक्ष देऊन या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.