For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकीय पक्षांच्या रॅलीमुळे शहरात वाहतूक कोंडी

11:03 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजकीय पक्षांच्या रॅलीमुळे शहरात वाहतूक कोंडी
Advertisement

वाहनधारकांना भर उन्हात रस्त्यावर थांबवून ठेवण्यात आल्याने संताप

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून शक्तीप्रदर्शन करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये बुधवारी काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊन बहुतांश भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून राजकीय पक्षांकडून रॅलींचे आयोजन केले जात आहे. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दुचाकी घेऊन सहभागी झाले होते. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरून ही रॅली काढण्यात आल्याने शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. परिणामी रहदारी पोलीस विभागाला वाहतूक इतर मार्गाने वळविणे भाग पडले. अशोक चौकातून चन्नम्मा चौकात आलेल्या रॅलीमुळे चन्नम्मा चौकातून होणारी वाहनांची रहदारी इतर मार्गाने वळवावी लागली.

तसेच बराचवेळ चन्नम्मा चौकात रॅली थांबून राहिल्याने या भागातून होणारी शहरांतर्गत वाहतूकही इतर मार्गाने वळविण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना बराचवेळ बसस्थानकात ताटकळत थांबावे लागले. तसेच भर उन्हात प्रवाशांना रस्त्यावर थांबवून ठेवण्यात आल्याने वाहनधारकांनाही उन्हाचे चटके सहन करावे लागले. राजकीय पक्षांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या प्रचार रॅलींमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत आहे. पोलीस व रहदारी विभागाकडून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुहेरी मार्गावरील वाहतूक एकाच मार्गावरून सुरू  होती. त्यामुळे चन्नम्मा चौकात काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. याचा परिणाम शहरातील इतर भागातील वाहतूक व्यवस्थेवरही झाला होता. राजकीय पक्षांकडून आयोजित प्रचार रॅलीदरम्यान वाहतूक व्यवस्था नियोजित करून रॅली काढण्याची प्रतिक्रिया वाहनधारकांतून व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.