नार्वेकर गल्लीत वाहतूक कोंडी
गटारीवरील फरशा रस्त्यावरच : अपघातात वाढ
बेळगाव : नार्वेकर गल्ली येथे गटारीचे खोदकाम करताना काढण्यात आलेल्या दगडी फरशा रस्त्यावरच टाकण्यात आल्याने वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. यामुळे वाहनांचे अपघात होत असून नागरिकांची वादावादी होत आहे. रिक्षा व कार यांच्यामध्ये किरकोळ अपघात झाल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बराचकाळ खोळंबली होती. त्यामुळे तातडीने येथील फरशा हटवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.
मागील पंधरा दिवसांपासून समादेवी मंदिर ते गवळी गल्लीपर्यंत गटारीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या ठिकाणच्या पूर्वीच्या फरशा काढून बाजूला ठेवण्यात आल्या आहेत. या फरशा रस्त्यावरच असल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. चारचाकी वाहनांची ये-जा करणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे समादेवी मंदिर कॉर्नर येथे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी एक कार व रिक्षामध्ये किरकोळ अपघात झाला. रिक्षाचा काही भाग कारला घासला गेल्याने दोघा चालकांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड गर्दी झाली होती. काही केल्या वाद मिटत नसल्यामुळे गर्दीत वाढ होत गेली. त्यामुळे या कोंडीत बरेच वाहनचालक अडकून पडले. बऱ्याच वेळानंतर ही कोंडी हटली गेली. त्यामुळे रस्त्यावरील दगडी फरशा हटविण्याची मागणी केली जात आहे.