बेळगाव रेल्वेस्थानकावर वाहतूक कोंडी
प्रवाशांना नेण्यासाठी आलेल्यांमुळे रस्त्याची अडवणूक : एकाचवेळी गर्दी झाल्याने फटका
बेळगाव : दिवाळी सणानिमित्त नोकरी-व्यवसायासाठी बाहेरगावी असलेले नागरिक बेळगावमध्ये परतू लागले आहेत. गुरुवारी सकाळी बेळगाव रेल्वेस्थानकाबाहेर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. बेंगळूर, म्हैसूर, मुंबई, पुणे येथून शेकडो नागरिक रेल्वेने बेळगावमध्ये दाखल झाले. एकाचवेळी गर्दी झाल्याने रेल्वेस्थानकाबाहेर वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. नैर्त्रुत्य रेल्वेने खास दीपावलीनिमित्त बेंगळूर-बेळगाव मार्गावर विशेष रेल्वे सोडली होती. त्याचबरोबर बेंगळूर-बेळगाव अंगडी एक्स्प्रेसदेखील गुरुवारी प्रवाशांनी फुल्ल भरून आली. मुंबईहून बेळगावला येणाऱ्या हुबळी एक्स्प्रेसमध्येही प्रचंड गर्दी होती. गुरुवारपासून दिवाळीला सुरुवात झाल्याने व यावर्षी साप्ताहिक सुटीला जोडून सुट्या आल्याने गावी परतणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
रेल्वेस्थानक परिसरात रहदारी पोलिसांची नेमणूक करा
गुरुवारी सकाळी रेल्वेस्थानक परिसरात वाहनांची गर्दी होती. रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहने आपापल्या नातेवाईकांना घरी घेऊन जाण्यासाठी दाखल झाल्याने गर्दी झाली होती. यामुळे रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी बराच कालावधी लागला. त्यामुळे किमान दिवाळीपर्यंत रेल्वेस्थानक परिसरात रहदारी पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे.