ट्रक रस्त्यात रुतल्याने वाहतूक 9 तास ठप्प
जांबोटी-खानापूर मार्गावरील राजवाडा फाट्यानजीकची घटना : बेळगाव-चोर्ला, अनमोड मार्ग अवजड वाहतुकीला बंदी असल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून अवलंब
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावर सोमवारी मध्यरात्री जांबोटी-राजवाडा फाट्यानजीक गोव्याहून खानापूरकडे जाणारा अवजड वाहतूक करणारा ट्रक रस्त्यापलीकडे बाजूच्या साईडपट्यामध्ये रुतल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल नऊ तास ठप्प झाली होती. मंगळवारी सकाळी 11 वाजता सदर अवजड वाहन क्रेनच्या साहाय्याने हटविण्यात आल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र रस्ता बंद झाल्याने संपूर्ण बससेवादेखील ठप्प झाल्यामुळे बेळगाव, खानापूर येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
सध्या बेळगाव-गोवा अनमोड घाट राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळून हा रस्ता खचल्यामुळे या रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच बेळगाव-चोर्ला रस्त्याअंतर्गत येणाऱ्या बेळगाव-जांबोटी रस्त्यावरील कुसमळी नजीकचा ब्रिटिशकालीन पूल हटवून त्या ठिकाणी मलप्रभा नदीवर नवीन पूल बांधकामाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे बेळगाव-जांबोटी-गोवा हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने, बेळगाव-गोवा आंतरराज्य वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारक गोवा-जांबोटी-खानापूर- बेळगाव या पर्यायी मार्ग उपलब्ध असल्यामुळे माल वाहतूकदार पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात अवलंब करीत आहेत.
गेल्या चार दिवसापासून जांबोटी-खानापूर राज महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू आहे. मात्र जांबोटी-खानापूर राज्य महामार्ग अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्याची रुंदी केवळ साडे तीन मीटर असल्यामुळे तसेच हा रस्ता अत्यंत अरुंद व घाट वळणाचा असल्याने मल्टी एक्सल वाहनांना अवजड वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक मानला जातो. तसेच वाढत्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. त्यातच रस्त्याच्या बाजूपट्या देखील पूर्णपणे खचल्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे म्हणजे कसरतच करावी लागते.
या रस्त्यावरून दुसऱ्या वाहनाला समोरासमोर बाजू देण्यासाठी वाहन रस्त्याकडेला गेल्यास वाहन पलटी होण्याचा धोका किंवा रुतण्याचा धोका असून अरुंद रस्त्यामुळे या रस्त्यावर सध्या अपघातांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारी मध्यरात्री गोव्याहून-खानापूरकडे खनिज वाहतूक करणारे अवजड वाहन जांबोटीनजीक रस्त्याकडेला रुतल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पूर्णपणे ठप्प झाली होती. या रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच बस सेवादेखील ठप्प झाल्यामुळे शालेय विद्यार्थी व प्रवासी वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
अवजड वाहतुकीला बंदी घालण्याची मागणी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्ग हा गोव्याला जोडणारा अत्यंत जवळचा मार्ग असल्यामुळे बेळगाव, हुबळी, धारवाड आदी ठिकाणाहून या रस्त्यावरून खनिज, लोखंड, भाजीपाला, भंगार, कचरा तसेच दूध आधीमालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वास्तविक पाहता या रस्त्याची वजन पेलण्याची क्षमता 15 ते 20 टन आहे. मात्र अवजड वाहतूक करणारी मल्टी एक्सल वाहने 40 ते 50 टन मालवाहतूक करीत असल्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होत असल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली असली तरी वाहतूकदारांनी पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर सुरूच ठेवल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वारंवार ठप्प होत असून त्याचा फटका या भागातील नागरिक व विद्यार्थी वर्गांना बसत आहे. या रस्त्यावरील अवजड वाहतूक त्वरित बंद करावी अशी मागणी होत आहे. तरी बेळगाव जिल्हा अधिकारी व सा. बां. खात्याच्या वरिष्ठ अभियंत्यांनी रस्त्याची पाहणी करून जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी जांबोटी भागातील नागरिकांमधून होत आहे.