Satara News : वाहतूक कोंडीचा फलटणकरांना त्रास
फलटण शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौकात वाहतूक कोंडी गंभीर
फलटण : फलटण शहरातील वाहतूक समस्यांचा प्रश्न गंभीर बनला असुन विशेषतः क्रांतीसिह नाना पाटील चौकात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे तासनतास वाहने रस्त्यावर अडकून पडत आहेत. छोटे मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नित्याच्याच असणाऱ्या वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी फलटणकर करत आहेत. क्रांतीसिंह नाना पाटील हा फलटण शहरातील मुख्य चौक असून त्याचा शहराचे प्रवेशव्दार म्हणून उल्लेख केला जातो. या चौकात सातत्याने जड वाहतुकीच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
या चौकातुन पंढरपूर, तुळजापुर, गाणगापुर, शिखर शिगणापुर, जेजुरी, गोंदवले, म्हसवड व अन्य तिर्थक्षेत्राला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. तसेच पुणे, सांगली, सातारा, विटा, बारामती, अहिल्यानगर, अकलुज, सांगोलाकडे जाणारी वाहने याच चौकातुन जातात. त्यामुळे हा चौक सतत वाहतुकीने गजबजलेला असतो व येथे सतत वाहतूक समस्या निर्माण होत असते.
या चौकालगतच फलटण बसस्थानक असून दिवसभरात जवळपास ७०० ते ८०० फेऱ्या एसटी बसच्या या चौकातून होतात. त्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसतो. या चौकालगतच मोठी शैक्षणिक संस्था असल्याने येथून शाळेत ये जा करणाऱ्या मुला मुलींची संख्याही मोठी आहे. तसेच इतर शाळा महाविद्यालत जाणारे विद्यार्थीही या चौकातुन जातात. त्याचबरोबर बारामती, फलटण येथील एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांच्या बसेस, शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस ही या चौकातून जातात. त्यामुळे या चौकात नियमित बर्दळ असते. येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा परिणाम व्यापारी पेठेवर तसेच लहान मोठ्या व्यवसायावर सुध्दा होत आहे.
गळीत हंगामात जवळपास आठ ते दहा साखर कारखान्याना ऊस वाहतूक या चौकातुनच होत असते. त्याच बरोबर मोठमोठे कंटनेर, ट्रेलर यांच्यामुळे मोठा परिणाम येथील वाहतुकीवर होतो.
बाह्य वळण रस्ता व सिग्नल यंत्रणा आवश्यक
क्रांतिसिंह नाना पाटील व अन्य चौकट होत असलेली नित्य वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी बाह्यवळण रस्ता काढून अवजड वाहतूक फलटण शहरा बाहेरून वळवणे, वाहतूक व्यवस्थापनासाठी सिग्नल यंत्रणा सुरु करणे. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक होणे, येथील बंद सिसिटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजाविणे, पार्किंग व्यवस्था करणे, बेशिस्त वाहन चालकावर दांडात्मक कारवाई करणे अशा अन्य उपाययोजना कराव्या लागतील.