ठिकठिकाणी लावलेल्या बॅरिकेड्समुळे शहरात वाहतूक कोंडी
बेळगाव : ईद ए मिलाद मिरवणुकीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत रविवारी बदल करण्यात आला. मिरवणूक मार्गावर वाहनांचे अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले. परंतु, यामुळे शहराच्या अंतर्गत भागात प्रचंड वाहतूक केंडी झाल्याचे दिसून आले. रविवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे खरेदीसाठी शहरात आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. फोर्ट रोडपासून राणी चन्नम्मा चौक मार्गे कॅम्पपर्यंत ईद ए मिलाद मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर शहराच्या अंतर्गत भागात ज्या ज्या ठिकाणी मुस्लीम समाज आहे, तिथे मिरवणुका काढल्या जात होत्या. त्यामुळे बॅरिकेड्स लावून शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना गल्लीबोळातून वाट काढावी लागली. खानापूर रोड मार्गे शहरात येणारी वाहतूक मिलिटरी महादेव मंदिर मार्गे कॅम्पमध्ये वळवण्यात आली. त्याचबरोबर ग्लोब थिएटर कॉर्नर येथूनही वाहतूक वळविण्यात आली होती. त्यामुळे वाहनचालकांना कॅम्पमधून महात्मा गांधी पुतळ्याकडून राणी चन्नम्मा चौकात पोहोचावे लागत होते.