शिवारातील मंगल कार्यालयांच्या दुतर्फा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
शेतात करतात मौजमजा, शेतकऱ्यांना मात्र होतेय सजा : कार्यालय प्रशासनाने दखल घेण्याची गरज
वार्ताहर/येळ्ळूर
लग्नसराई सुरू झाली की येळ्ळूर-वडगाव दरम्यान असणाऱ्या मंगल कार्यालयांमुळे रस्त्यावर होणाऱ्या दुतर्फा पार्किंगमुळे वाहतूक विस्कळीत होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. मुळात या रस्त्यावरुन चारचाकी वाहनांबरोबर डंपर, टेम्पो आदींची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. दुतर्फा पार्किंगमुळे कार्यालय परिसरात वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक विस्कळीत होते. एक तर कार्यालयांची पार्किंग व्यवस्था असावी अथवा वाहने पार्किंग करताना वाहतुकीची कोंडी होणार नाही, अशा नियोजनबद्ध पद्धतीने पार्किंग व्हावे. अपघाताला निमंत्रण मिळेल, अशाप्रकारचे पार्किंग नसावे, अशी सूचना नेहमी ये-जा करणाऱ्या वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.
या मंगलकार्यालयाचा परिसर हा शेतीचा आहे. हौस, मौजेच्या नावाखाली बसणाऱ्या दारुच्या मैफली हे शेतकऱ्यांची डोकेदुखी झाली आहे. या मैफली शेतात किंवा शेतातील झाडाखाली होताना टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पेले आणि काचेच्या बाटल्यांचा कचरा काढताना परिसरातील शेतकऱ्यांची पुरेवाट होते. कांहीवेळा जाताना काचेच्या बाटल्या फोडल्या जातात. शेतकरी वर्ग हा कधी चिखलात तर कधी अनवाणी शेतात काम करीत असतो. अशावेळी काचा पायात घुसून जखमा होण्याची शक्यता असते. हा कचरा लग्नसराई संपेपर्यंत नित्याचीच असल्याने शेतकऱ्यांना मात्र नाहक मनस्ताप होत आहे. याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. हौस-मौज करणाऱ्यांची एक दिवस मजा आणि परिसरातील शेतकऱ्यांना मात्र बारा महिन्यांची सजा भोगावी लागते आहे, असे चित्र आहे.