मध्यमवर्गीय-गरिबांचे हित साधणारा अर्थतज्ञ
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली : उपमुख्यमंत्र्यांचा श्रद्धांजली सभेत सहभाग
प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अभियानाला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरील सर्व कार्यक्रम रद्द करून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी या श्रद्धांजली सभेत भाग घेतला.
डॉ. मनमोहन सिंग हे श्रेष्ठ अर्थतज्ञ होते. देशातील मध्यमवर्गीय व गरिबांच्या हितासाठीच त्यांनी देशाच्या आर्थिक धोरणाची रचना केली. सोनिया गांधी यांनी आपल्यासाठी चालून आलेल्या पंतप्रधानपदाचा त्याग करून डॉ. मनमोहन सिंग यांची त्या पदासाठी निवड केली. त्यानंतर तब्बल दहा वर्षे त्यांनी समर्थपणे देशाचे सारथ्य चालविले, अशा शब्दात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मामोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. सीपीएड मैदानावर शुक्रवारी सकाळी श्रद्धांजली सभा झाली. यावेळी बोलताना सिद्धरामय्या यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनाचा आढावा घेतला. गरीब कुटुंबात जन्म घेऊन जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ म्हणून त्यांनी ख्याती मिळविली. दोन वेळा ते पंतप्रधान झाले. त्यांच्यापेक्षाही मोठे अर्थतज्ञ असू शकतात.