उड्डाणपुलावरील कामामुळे वाहतूक कोंडीचे सत्र सुरूच
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहनांच्या लांबच लांब रांगा
बेळगाव : तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याचे काम सुरू असल्याने काँग्रेस रोडमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे सोमवारी काँग्रेस रोड परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. अनगोळ नाका ते दुसरे रेल्वेगेटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. सोमवारी सकाळी 9 पासून 11 वाजेपर्यंत या परिसरात मोठी गर्दी झाली होती. नोकरदारवर्ग एकाच वेळी कामाला निघाल्याने गर्दी दिसून आली. तसेच टिळकवाडी परिसरात अनेक शाळा असल्याने उद्यमबागमार्गे येणारे विद्यार्थी काँग्रेस रोडवरून दुसरे रेल्वेगेटमार्गे शाळांमध्ये जात होते. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. गर्दी टाळण्यासाठी दुसरे रेल्वेगेट येथे बॅरिकेड्स घालण्यात आले आहेत. परंतु, यामुळे काँग्रेस रोडवरील पुढील भागात गर्दी होऊ लागली आहे. दुसरे रेल्वेगेट येथे रहदारी पोलिसांची नेमणूक केली असली तरी अनगोळ कॉर्नर ते रेल्वेगेटपर्यंत कोंडी वाढली आहे. दुचाकी, चारचाकी तसेच रिक्षाचालक आपले वाहन पुढे रेटण्यासाठी घाई करत असल्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. उड्डाणपुलावरील रस्त्याचे काम पूर्ण होण्यास अद्याप काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने पुढील काही दिवस या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.