For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चव्हाट गल्लीत पारंपरिक होलिकोत्सव

10:29 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
चव्हाट गल्लीत पारंपरिक होलिकोत्सव
Advertisement

होळी उभारून नारळ उडविण्याची प्रथा

Advertisement

बेळगाव : शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार बेळगावच्या चव्हाट गल्ली येथे शहरातील सर्वात मोठी होळी उभी करण्यात आली. चव्हाट गल्ली तसेच परिसरातील नागरिकांनी रविवारी किल्ला येथून होळीचे झाड आणले. पारंपरिक पद्धतीने बैलगाड्यांनी ओढत गाड्यावरून होळी आणण्यात आली. सोमवारी दुपारी होळीचे दहन करून सायंकाळी चव्हाटा देवाची यात्रा संपन्न झाली. चव्हाट गल्ली येथे आजही पारंपरिक पद्धतीने होळी व धूलिवंदन साजरे केले जाते. चव्हाटा मंदिराच्या मागील बाजूला वाले, संघी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने होळी उभी केली जाते. प्रथम कोलकार समाजाच्या होळीचे दहन होते. त्यानंतर तेथील विस्तव नेऊन चव्हाटा मंदिर येथील होळीचे दहन करण्यात येते. दुपारी 3.30 वाजता मानकऱ्यांनी गाऱ्हाणे घातल्यानंतर होळीचे दहन करण्यात आले. गल्लीतील पंच मंडळ व युवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी 5 वाजता चव्हाटा मंदिर येथे अक्षतारोपण करून यात्रेला सुरुवात झाली. होळीच्या झाडाला बाशिंग बांधल्यानंतर नारळ उडविण्यास सुरुवात झाली. आपले नवस पूर्ण झाल्यानंतर नारळ उडविण्यासाठी बेळगावसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूर्यास्तापर्यंत नारळ उडविण्याचा कार्यक्रम सुरू होता. भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती. चव्हाटा म्हणजे गावचे मुख्य प्रवेशद्वार. ही प्रथा चव्हाट गल्लीने आजही राखली असून पारंपरिक पद्धतीने होळीसह इतर सर्वच धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात.

Advertisement
Advertisement
Tags :

.