शहरात पारंपरिक दसरोत्सव उत्साहात
ढोलताशांचा गजर, घंटानाद-जयघोषात पालख्यांचे आगमन
बेळगाव : ढोल-ताशांचा गजर, अखंड सुरू असलेला घंटानाद, देवदेवतांचा सुरू असलेला जयघोष आणि त्यात नाचविल्या जाणाऱ्या सासनकाठ्या अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी बेळगावचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. मराठी विद्यानिकेतनच्या क्रीडांगणावर झालेल्या या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने बेळगावमधील नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रथमच शिस्तबद्धरीत्या नियोजन करण्यात आल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.
बेळगावमधील प्रमुख मंदिरांच्या पालख्या वाजतगाजत काढल्या जातात. कपिलेश्वर, समादेवी, बसवाण्णा, स्वामी समर्थ, मातंगी, चव्हाट गल्ली व नार्वेकर गल्ली येथील जोतिबाच्या पालख्या व सासनकाठ्या तसेच मारुती मंदिरचे वाहन मिरवणुकीत सहभागी असते. हुतात्मा चौक येथून शनिवारच्या मिरवणुकीला वाजतगाजत सुरुवात झाली. चव्हाट गल्ली येथील देवदादा सासनकाठीचा मानाचा नंदी (कटल्या) मिरवणुकीच्या अग्रभागी होता. पारंपरिक वाद्यांचा गजर करत ही मिरवणूक ज्योती कॉलेज येथील मराठी विद्यानिकेतनच्या क्रीडांगणावर पोहोचली.
मानाच्या चव्हाट गल्लीच्या कटल्याने आपट्याच्या फांदीला उडविल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बेळगावचे पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग उपस्थित होते. देवस्थान मंडळ तसेच नवरात्रोत्सव महामंडळाच्यावतीने पोलीस आयुक्तांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिजीत चव्हाण-पाटील, तुषार चव्हाण-पाटील, नंदकिशोर चव्हाण-पाटील, देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, गणेश दड्डीकर, परशराम माळी, विजय तमूचे, नवरात्रोत्सव महामंडळाचे आनंद आपटेकर, बाबू कुरबर, बाबू पुजारी यांनी मेहनत घेतली. आरती झाल्यानंतर सीमोल्लंघन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी यंदे खूटपासून युनियन जिमखाना रोडवर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने बराच काळ कोंडी झाली होती.