नवरात्रोत्सवासाठी तुळजापूर येथून ज्योत आणण्याची परंपरा
सोलापूर प्रतिनिधी
आजपासून प्रारंभ होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवास तुळजापूर येथील तुळजाभवानी आईची ज्योत आणण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध खेड्यातील व शहरातील दुर्गाशक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आनंद शनिवारी रात्री भक्तीने ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर पुणे रोडवर विविध मंडळांच्या कार्यकर्ते भक्तिमय संगीताच्या साथीने नृत्य ताल धरत देवीच्या आठवणीत नृत्यामध्ये रममाण झाले होते.लांबोटी येथे काही काळ चहापान व विश्रांतीसाठी थांबलेल्या विविध दुर्गाशक्ती मंडळांचे सभासद एकत्र आल्यानंतर प्रचंड गर्दी झाली होती.विविध गावांमधील अनोळखी कार्यकर्ते भक्त तुळजाभवानी आईच्या आठवणीत रममाण होऊन भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र निदर्शनास येत होते.
सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी येथील हॉटेल सुनील व हॉटेल जयशंकर ही दोन्ही हॉटेल्स व त्यासमोरील जागा भक्त कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या.या दोन्ही ठिकाणी विविध गावांतील कार्यकर्ते व भक्त देवीच्या गाण्यावर सर्वांना सोबत घेत नाचताना दिसले.आपापल्या पद्धतीने वेळ व सेवा दिल्यानंतर ही मंडळी तुळजापूरकडे ज्योत आणण्यासाठी मार्गस्थ झाली.
पुढे सावळेश्वर टोळ नाक्यावरदेखील भक्तांची अशीच गर्दी पहायला मिळाली.या ठिकाणी डॉल्बीवर सुंदर तालवाद्याच्या नुसत्या आवाजावर शेल्याचे सुंदर डाव व नृत्य सुरू होते.यावेळी या महामार्गावरून जाणारे दुचाकीधारक थांबून या भक्तमंडळींचा हा अनोखा नृत्यप्रकार पाहत होते.काही वेळ नृत्याद्वारे आनंद साजरा केल्यानंतर ही मंडळीदेखील पुढे तुळजाभवानी आईच्या मंदिरातून ज्योत आणण्यासाठी मार्गस्थ झाली.
शनिवारी रात्रीपासून भक्तांनी सोलापूर- पुणे महामार्गावर ज्योत आणण्यासाठी आलेली ही मंडळी ज्योत घेतल्यानंतर तुळजापूरहून निघाल्यानंतर अविरत न थकता ती ज्योत आपापल्या गावातील उत्सव ठिकाणी आणल्यावरच विश्रांती घेतात व सेवा दिल्याचे समाधान व्यक्त करतात.