व्यापाऱ्यांनी डिजिटल अरेस्टचा प्रकार हाणून पाडला
शास्त्रीनगर-शहापूरच्या दोघा व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न, सावधानता बाळगण्याचे सीईएनचे आवाहन
बेळगाव : सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या डिजिटल अरेस्टच्या प्रकारांबद्दल सातत्याने जागृती करूनही असे प्रकार सुरूच आहेत. खासकरून अशा प्रकारांना उच्चशिक्षित, निवृत्त नोकर, ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत. सोमवारी बेळगाव येथील दोन व्यापाऱ्यांना डिजिटल अरेस्ट करून फसविण्याचा प्रकार घडला आहे. शास्त्रीनगर व शहापूर येथील दोघा व्यापाऱ्यांशी सायबर गुन्हेगारांनी संपर्क साधून तुमच्या नावे वॉरंट आहे. कारवाईसाठी आम्ही तुमच्या घरी येत आहोत. कारवाई टाळायची असेल तर आमच्या साहेबांशी चर्चा करा, असे सांगत त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. हे दोन्ही व्यापारी वेळीच सावध झाल्यामुळे फसवणूक टळली आहे. सोमवारी सकाळी शास्त्राrनगर येथील एका व्यापाऱ्याशी संपर्क साधून आम्ही खडेबाजार पोलीस स्थानकामधून बोलतो आहोत. तुम्ही एका राष्ट्रीयीकृत बँकेत घोटाळा केला आहे. तुमच्या नावे
वॉरंट निघाला आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई करावी लागणार आहे, असे सांगत त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न झाला. कारवाई नको असेल तर आमच्या वकिलांशी संपर्क साधून प्रकरण मिटवून घ्या, असा सल्ला देण्यात आला. मात्र, खडेबाजार पोलिसांचे नाव घेतल्यामुळे सावध झालेल्या व्यापाऱ्यांनी तुम्ही येऊ नका, मीच पोलीस स्थानकात येतो, असे सांगितले. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी त्या व्यापाऱ्याशी संपर्क बंद केला. शहापूर येथील आणखी एका व्यापाऱ्याशी संपर्क साधून आम्ही मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत आहोत. तुमचे सीमकार्ड वापरून गुन्हे करण्यात आले आहेत. तुमच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला अटक करण्यासाठी आमचे पथक तुमच्या घरी येत आहे, असे सांगत त्यांना घाबरवण्यात आले. हा व्यापारीही वेळीच सावध झाल्यामुळे त्यांची फसवणूक टळली.
फसवणूक झाल्यास त्वरित 1930 क्रमांकावर संपर्क साधा
पोलीस, सीबीआय, ईडी, महसूल, प्राप्तिकर आदी विभागांबरोबरच आता न्यायाधीशांच्या नावांचाही गुन्हेगार फसवणुकीसाठी वापर करू लागले आहेत. खासकरून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सावजांना ठकवण्यात येत आहे. यापैकी कोणत्याही विभागाचे अधिकारी थेट व्हिडिओ कॉल करत नाहीत. त्यामुळे फसवणूक करणारे गुन्हेगारच अशी क्लृप्ती वापरतात, याची जाणीव असली तरच फसवणूक टाळता येणार आहे. सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सायबर क्राईम विभागाने केले आहे.
उच्चशिक्षितच गुन्हेगारांच्या कारवायांचे शिकार
डिजिटल अरेस्टचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. निवृत्त अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी, उद्योजकांशी संपर्क साधून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरण मिटवण्यासाठी आम्ही सांगतो त्या खात्यावर रक्कम जमा करा, असे सांगत सावजांना फसवण्यात येत आहे. देशभरात रोज 7 हजारहून अधिक असे प्रकार घडत असून सावजांना विश्वास पटावा यासाठी पोलीस, सीबीआय, ईडीच्या लोगोंचा वापर केला जातो. काहीवेळा बनावट कागदपत्रे तयार करून सावजाला पाठवण्यात येतात. उच्चशिक्षितच या गुन्हेगारांच्या कारवायांचे शिकार ठरत आहेत. फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे एकच उपाय असल्याचे सायबर क्राईम विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.