अतिक्रमण हटावला व्यापाऱ्यांचा जोरदार विरोध
पोलीस आयुक्तांची घटनास्थळी धाव : गणपत गल्ली येथील प्रकार, अतिक्रमण हटाव पथकासह जेसीबी दाखल
बेळगाव : गणपत गल्लीतील व्यापाऱ्यांनी गटारीबाहेर केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलीस व मनपाचे अतिक्रमण हटाव पथक मंगळवारी चक्क जेसीबीसह दाखल झाले. कटरच्या साहाय्याने लोखंडी अँगल व इतर साहित्य हटविण्यास सुरुवात करण्यात आल्याने या कारवाईला व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार विरोध केला. आमदार राजू सेठ यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ही बाब वरिष्ठांना कळविली. त्यामुळे काही वेळातच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग गणपत गल्लीत दाखल झाले. त्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून बाजारपेठेत फेरफटका मारला. गेल्या 15 दिवसांपासून वाहतूक पोलीस व मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून बाजारपेठेत दुकानाबाहेर करण्यात आलेले अतिक्रमण हटविले जात आहे. दुकान सोडून गटारीबाहेर ज्या व्यापाऱ्यांनी साहित्य मांडले आहे ते जप्त केले जात आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही कडेला मांडण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्याच्या आत बैठे विक्रेते आणि फेरीवाले थांबून व्यवसाय करणे गरजेचे आहे. मात्र बहुतांश जण रस्त्यावरच थांबून व्यापार करत असल्याने गणपत गल्लीतून वाहन तर दूरच चालत जाणेही कठीण झाले आहे.
त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त जोतिबा निकम यांनी पुढाकार घेत अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. मात्र या कारवाईला व्यापाऱ्यांतून विरोध होत आहे. दुकान सोडून गटार किंवा त्याबाहेर करण्यात आलेले अतिक्रमण व्यापाऱ्यांनी स्वत:हून हटवावे अन्यथा जेसीबी लावण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला होता पण अतिक्रमण हटविण्यात न आल्याने मंगळवारी स्वत: पोलीस व मनपाचे कर्मचारी जेसीबी घेऊन गणपत गल्लीत दाखल झाले. कटरच्या साहाय्याने लोखंडी अँगल व इतर साहित्य हटविण्यास सुरुवात केली. मंगळवार असल्याने बहुतांश दुकाने बंद होती. पण जी दुकाने सुरू होती त्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरत कारवाईला जोरदार विरोध केला. व्यापाऱ्यांनी ही माहिती राजू सेठ यांना दिली. त्यामुळे आमदार सेठ यांनी पोलिसांना कारवाई थांबविण्याची सूचना केली. ही माहिती समजताच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग तातडीने गणपत गल्लीत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत गणपत गल्ली, कमळी खूट, नरगुंदकर भावे चौकासह मुख्य बाजारपेठेत फेरफटका मारून पाहणी केली. अतिक्रमण हटाव मोहिमेसंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी सायंकाळी 5 वाजता गणपत गल्लीतील दुर्गा हॉटेलमध्ये व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
खडेबाजार पोलीस निरीक्षकांची धावाधाव
अतिक्रमण हटाव मोहिमेला व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध केल्याचे समजताच पोलीस आयुक्त गणपत गल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून बाजारपेठेत फेरफटका मारला. हा सर्व परिसर खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. मात्र पोलीस आयुक्त आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांना उशिरा समजली. त्यामुळे ते काही वेळानंतर गणपत गल्लीत दाखल झाले. सेंट्रल मेडिकलसमोर आपल्या वाहनातून खाली उतरले. मात्र तोपर्यंत पोलीस आयुक्त नरगुंदकर भावे चौकापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक गाबी धावतच त्याठिकाणी गेले.
तक्रारी आल्यानेच कारवाई : पोलीस आयुक्त
बाजारपेठेत व्यावसायिक व व्यापाऱ्यांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे याचा फटका सहन करावा लागत असल्याने कारवाई करण्यात यावी, अशा अनेक तक्रारी जनतेने केल्या आहेत. त्यामुळेच ही अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे.