तानाजी गल्ली-भांदूर गल्लीतील व्यापारी डबघाईला
वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने व्यापार थंडावला : काहींनी दुकाने काढली विक्रीस
बेळगाव : तानाजी गल्ली येथील रेल्वेगेट 10 मार्चपासून नैर्त्रुत्य रेल्वेने कायमस्वरुपी बंद केले आहे. त्यानंतर आता या ठिकाणी काँक्रिटची भिंत बांधली जात असल्याने तानाजी गल्ली व फुलबाग गल्ली यांचा संपर्क पूर्णपणे ठप्प झाला आहे. याचा परिणाम येथील व्यापाऱ्यांनी आपले दुकानगाळे विक्री तसेच रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेगेट बंद झाल्याने व्यापार ठप्प झाला असून दुकान बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे उत्तर व्यापारी देत आहेत. कपिलेश्वर उड्डाणपुलापाठोपाठ तानाजी गल्ली येथे रेल्वेगेट होणार होते. सततची वाहतूक कोंडी तसेच येथील रेल्वेगेट नैर्त्रुत्य रेल्वेसाठी डोकेदुखीचे ठरत असल्याने उड्डाणपुलाचा आराखडा तयार करण्यात आला. परंतु, स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे उड्डाणपुलाचा प्रस्ताव बारगळला. परंतु, त्याचवेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी हे रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद केले जाईल, असे स्पष्ट केले होते. नागरिकांनी त्याला होकार दिला होता.