'दत्त-दालमिया'कचे ऊस वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर प्रयाग चिखलीत अडवले
ऐन दिवाळीच्या दिवशीच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा हुंकार
मागील हप्त्यातील चारशे रुपये आणि चालू दर साडेतीन हजार रुपये मिळावा यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन चालू असून आज ऐन दिवाळीच्या दिवशीच करवीर तालुक्यातील दोनवडे येथील शेतकऱ्यांचा ऊस प्रयाग चिखली मार्गे दालमिया आसुर्ले कारखान्याकडे घेऊन जाणाऱ्या उसाच्या सहा ट्रॅक्टर ट्रॉली शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी प्रयाग चिखली येथे अडवून आंदोलन केले.
दरम्यान, या सहा ट्रॉल्या पोलीस बंदोबस्तामध्ये दालमिया कारखान्याकडे जात होत्या. यावेळी प्रयाग चिखली चौकामध्ये ऊस भरलेले ट्रॅक्टर आले असता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यासह स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी या ट्रॉल्या अडवल्या यावेळी संघटनेचे कार्यकर्त्यांनी करवीर पोलिसांची हुज्जत घालत कोणत्याही परिस्थितीत ऊस ट्रॉली या कारखान्याकडे जाणार नाहीत अशी भूमिका घेतल्यामुळे प्रयाग चिखली चौकामध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला यावेळी कारखाना प्रशासन तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली यावेळी संघटनेचे कार्यकर्ते ग्रामस्थ अशा तीन चारशे लोक गोळा झाल्यामुळे अखेर पोलिसांनी कायदा व्यवस्थापन बिघडू नये म्हणून सदरच्या ऊस ट्रॉल्या पुन्हा जिथून ऊस आणला त्या दोनवडे गावाकडे वळवण्यात आल्या त्यावेळी कार्यकर्ते शांत झाले यावेळी कार्यकर्त्यांनी पुन्हा ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आले तर ट्रॅक्टर ट्रॉलीचे नुकसान केल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दमही यावेळी घोषणातून दिला.