जोतिबा डोंगरावर काळभैरव जन्मोत्सव उत्साहात
कोल्हापूर :
काळभैरवाच्या नावानं चांगभलं, जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या अखंड गजरात दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिरात काळभैरव जन्मकाळ सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. महाभिषेक, महापोशाख, होमहवन, महाप्रसाद व विविध धार्मिक विधी सोहळ्याने जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी प्रचंड आतिषबाजी करण्यात आली. सोहळ्यावेळी ग्रामस्थ, पुजारी व भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
शनिवारी काळभैरव जन्मोत्सव निमित्त काळभैरव, जोतिबा, नंदी, महादेव, यमाई, चोपडाई या देवांची महापूजा श्रींचे पुजारी हिम्मत नवाळे, उत्तम भेवदर्णे, राजाराम बनकर, बाळासो सांगळे, तुषार झुगर, केदार शिंगे, महालिंग शिंगे, गणेश चौगले, वामन ठाकरे, कैलास ठाकरे, रामचंद्र बुने, स्वप्नील दादर्णे, गणेश बुणे, गणेश दादर्णे यांनी बांधली होती. श्री जोतिबाच्या मंदिरात केदार कवच, केदार स्तोत्र, केदार महिमा व काळभैरव मंदिराजवळ धार्मिक विधी व होम हवन, केरबा उपाध्ये कमलाकर उपाध्ये, रोहित उपाध्ये, केदार चिखलकर, प्रकाश उपाध्ये, संतोष भोरे, श्रीनाथ उपाध्ये, बजरंग सांगळे, गणेश उपाध्ये, सुरज उपाध्ये यांनी केले.
जोतिबा डोंगरावर सर्व देवतांमध्ये जोतिबा देवाला काळभैरव प्रिय आहे. केदारनाथांच्या अवतार कार्यात काळभैरवांनी अलौकिक व महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली म्हणून महालक्ष्मी अंबाबाईने भैरव सेनेच्या सरसेनापतीपदी निवड केली. क्षेत्राचा अधिपती असल्याने नारळ वाढवण्याचा मान त्यांना दिला आहे. त्यामुळे जोतिबा डोंगरावर परंपरेनुसार काळभैरव जयंती उत्साहात साजरी केली जाते.
दरम्यान, पहाटे 4 वाजता घंटानादाने श्री काळभैरव जयंती सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी श्री जोतिबा व काळभैरव यांची पाद्यपूजा व काकडआरती करण्यात आली. त्यानंतर सर्व देवांना महाभिषेक घालून आकर्षक महापूजा बांधण्यात आली. यावेळी काळभैरवास लघुरुद्र अभिषेक, पोशाख व अलंकार महापूजा, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नवग्रह पुजन, क्षेत्रपाल पूजन, होम हवन विधी झाले. पुरोहितांनी मंत्र पठण केले. दुपारी 2 ते 5 दरम्यान, ज्योतिर्लिंग भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. गजानन डवरी मच्छिंद्र डवरी व विश्वनाथ डवरी यांचा डवरी गीतांचा कार्यक्रम झाला. सायंकाळी श्री काळभैरव जन्मकाळ सोहळा मंदिरात श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते झाला.
यावेळी काळभैरवाचा पाळणा गीत गायिले. यावेळी पुजारी, ग्रामस्थ, आबालवृद्ध, गावकरी प्रतिनिधी, खंडकरी पुजारी व भाविकांनी गुलाल, पुष्पवृष्टी करून चांगभलंचा गजर केला. यावेळी ग्रामस्थ, पुजारी, खंडकरी पुजारी तसेच देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडे, जोतिबा देवस्थानचे प्रभारी धैर्यशील तिवले, सिंधीया देवस्थान ट्रस्टचे अधिकारी अजित झुगर, कोल्हापूर देवस्थानचे सहसचिव महादेव दिंडे माजी सभापती विष्णुपंत दादर्णे, माजी उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, जोतिबा डोंगर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा झाला.
काळभैरवाची भैरवरुपात उत्सवपुजा बांधली होती. काळभैरव मंदिरासमोर भव्य मंडप घालून फुलांची व केळीच्या पानांची आकर्षक सजावट केली होती. जोतिबाची चतुर्भुज रुपातील सुवर्णालंकारित महापूजा बांधली होती. काळभैरव जन्मोत्सव झाल्यानंतर सुंठवडा वाटप केला. फटाक्यांची आतिषबाजी करून सोहळ्याची सांगता झाली. भाविकांना कार्तिकस्नान ग्रुपच्यावतीने प्रसाद वाटप करण्यात आला. रात्री भावगीतांचा व सोंगी भजनाचा कार्यक्रम झाला.