ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रॉलीची हवा सोडली
कोल्हापूर :
शिरोळ तालुक्यातील ऊस आंदोलन भडकले असून बुधवारी मध्यरात्री सुमारास कर्नाटक राज्यातून ऊस भरून आलेले ट्रॅक्टर ऊस दरासाठी आंदोलन छेडलेल्या संघटनानी अडवून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमधील हवा सोडून ऊस वाहतूक रोखून धरली होती. शिरोळ दरम्यानच्या सलगर-सदलगा राज्य मार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या रांगा लागल्या होत्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुशने चालू वर्षाची पहिली उचल 3700 रूपये व 23-24 सालातील गळीत हंगामासाठी 200 रूपये अंतिम हप्ता द्यावा अशी मागणी लावून धरत जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत ऊसतोड आणि वाहतूक करू नये केल्यास ती बंद पाडू असा इशारा दिला आहे.
बुधवारी मध्यरात्री सुमारास कागवाड येथून गणेशवाडी मार्गे कर्नाटक राज्यातून ऊस भरून गाळपासाठी कारखान्याकडे जात असल्याची माहिती संघटनांना मिळताच औरवाड फाट्यावर उसाने भरलेले ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या चाकाची हवा सोडून वाहतूक रोखून धरली त्या पाठोपाठ आणखीन काही कर्नाटकातील ऊस ट्रॅक्टर आले असता त्यांनाही रोखून धरले. त्यामुळे सलगर-सदलगा राज्यमार्गावर ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
गुरुवारी दुपारी कारखाना समर्थकांनी उपस्थित राहून चाकामध्ये हवा भरून ऊस कारखान्याकडे नेला. ऊस दराबाबत अद्याप साखर कारखानदारांनी दराची घोषणा केली नसल्याने शेतकऱ्यांनी उसतोड देऊ नये असेही आवाहन संघटनानी केले होते. शिरोळ तालुक्यात काही ठिकाणी ऊस तोड सुरू होती. ती बंद पाडली आहे. कर्नाटकात मात्र ऊसतोड सुरू आहे.ऊस दर जाहीर झाल्याशिवाय संघटना शांत बसणार नाही आंदोलन तीव्र करणार असल्याचे आंदोलन अंकुशचे धनाजी चूडमुंगे यांनी सांगितले.