‘दादा’, ‘भाई’, ‘बॉस’ अशा नंबर प्लेटला बसणार लगाम
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक
एकाच साईजमध्ये नंबर प्लेट असणार
संबंधित कंपनीकडून दिलेलीच नंबर प्लेट लावावी लागणार
जुनी नंबर प्लेट बदलण्यासाठी तीन महिन्यांची मुदत
1 एप्रिलपासून 2025 पासून होणार कडक अंमलबजावणी
कोल्हापूरः विनोद सावंत
प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. यामुळे नियमबाह्या लावण्यात येत असलेल्या नंबर प्लेटला आता लगाम बसणार आहे. या नियमामुळे ‘दादा’, ‘बॉस’, ‘भाई’ अशा वाहनांवर लावण्यात येत असणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट कालबाह्या होणार आहेत. 1 एप्रिल 2025 पासून याची अंमलबजावणी होणार असून यापूर्वी नवीन नियमानुसार नंबर प्लेट लावावी लागणार आहे.
कोल्हापूरमध्ये वाहनांच्या नंबरची क्रेझ आहे. ठरविक नंबरसाठी लाखो रूपये मोजाले जातात. यातून कोल्हापूर प्रादेशिक विभागाला दरवर्षी कोट्यावधींचा महसूल मिळतो. परंतू काहींकडून फॅन्सी नंबरात मोडतोड करून नियमबाह्या पद्धतीने लावत असल्याचेही अनेक उदाहरणे येथे पाहण्यास मिळतात. फॅन्सी नंबर असल्याने नंबर प्लेटची साईजही मोठी करून लावली जाते. तर काहींकडून नियमबाह्या प्लेट लावले जातात. यामध्ये 8055 हा नंबर असताना ‘बॉस’ असे लिहिलेल्या नंबर प्लेट लावल्याच्या अनेक पाहिल्या आहेत. याच पद्धतीने ‘भाई’, ‘दादा’ अशा अनेक नियमबाह्या नंबर प्लेट पाहण्यास मिळतात. यावर शहर वाहतूक नियंत्रण शाखा तसेच आरटीओ विभाग कारवाई करते. परंतू कारवाईनंतर पुन्हा अशा प्रकारच्या नंबरप्लेट लावल्या जातात. आरटिओ विभागाने यावर आता कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्याची तरतूद केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसे आदेश दिले आहेत. यानुसार सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अंमलबजावणी करण्यासाठी रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्रालयाने 1 एप्रिल 2019 पासून उत्पादीत होणाऱ्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत तरतूद केली आहे. यानुसार नंबर प्लेट लावल्या जात आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाच्या परिपत्रकानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना ‘एचएसआरपी’ नुसार नंबर प्लेट बसवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जुन्या नंबर प्लेट बदलून नवीन नियमानुसार लावाव्या लागणार आहेत. यामुळे दादा, भाई, बॉस अशा नंबर प्लेट लावणाऱ्यांना लगाम बसणार आहेत.
आरटीओ देणारीच नंबरप्लेट लावावी लागणार
राज्य शासनाने नवीन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नंबर प्लेट देण्यासाठी कंपनीची निवडीसाठी निविदा प्रक्रिया राबवून 3 संस्था, उत्पादकांची निवड केली आहे. यांच्याकडूनच जुनी नंबर प्लेट बदलून नवीन घ्यावी लागणार आहे. अधिकृत फिटमेंट सेंटर्सकडून वाहनांवर बसवलेले एचएसआरपी हेच केवळ वैध मानले जाणार आहे. त्यामुळे इतर कोणत्याही एचएसआरपी निर्मात्याकडून अथवा पुरवठादाराकडून बसवलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायदा व नियमांच्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
450 रूपयांचा बसणार भुर्दंड
सध्याची नंबर प्लेट काढून नवीन एचएसआरपीनुसार नंबर प्लेट बसविण्यासाठी दर निश्चित केले आहेत. यामध्ये दुचाकीसाठी 450 रुपये, तीन चाकीसाठी 500 रुपये व इतर सर्व वाहनांसाठी 745 रुपये याप्रमाणे आहे. वाहनधारकांना ही नंबर प्लेट बसविण्यासाठी आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
नवीन नंबरप्लेट बसविली नसल्यास काय होणार
प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन मालकीचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता, बदल, वित्त बोजा चढविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, विमा अपडेट इत्यादी वाहन संदर्भातील कामे होणार नाहीत.
प्रतिक्रिया
नंबर प्लेटमध्ये छेडछाड, बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविण्यासाठी वाहनांना एसएसआरपीनुसारच नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. 2019 नंतर सर्वच वाहनांना अशा प्रकारच्या नंबर प्लेट आहेत. आता 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व जुन्या वाहनांना नवीन नियमानुसार नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. तीन महिन्यांत या नंबर प्लेट बदलण्यासाठी अवधी आहे.
संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर