टाऊनसेंड-सिनियाकोव्हा, पॅटेन-हेलिओव्हेरा विजेते
वृत्तसंस्था/ लंडन
2024 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत अमेरिकेची टेलर टाऊनसेंड आणि तिची झेकची साथिदार कॅटरिना सिनियाकोव्हा यांनी महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. ब्रिटनचा हेन्री पॅटेन आणि फिनलँडचा हेलिओव्हेरा यांनी पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले.
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात टाऊनसेंड आणि सिनियाकोव्हा यांनी कॅनडाची डेब्रोव्हेस्कि व न्यूझीलंडची रुटलिफ यांचा 7-6 (7-5), 7-6 (7-1) अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या अंतिम लढतीतील दोन्ही सेट्स टायब्रेकरपर्यंट लांबले. अमेरिकेच्या टाऊनसेंडचे हे ग्रँडस्लॅममधील पहिले जेतेपद आहे. टाऊनसेंडला यापूर्वी 2022 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत तसेच गेल्या वर्षी झालेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत दुहेरीच्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती. सिनियाकोव्हाने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत नऊ ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत. सिनियाकोव्हाने 2022 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत आपले पहिले दुहेरीतील विजेतेपद पटकाविले होते.
पुरुष दुहेरीच्या झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात ब्रिटनचा पॅटेन आणि त्याचा फिनलँडचा साथिदार हेलिओव्हेरा यांनी ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स प्यूरसेल आणि जॉर्डन थॉमसन यांचा 6-7 (7-9), 7-6 (8-6), 7-6 (11-9) असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. तीन महिन्यांपूर्वी पॅटेनने हेलिओव्हेरा बरोबर दुहेरीत खेळण्याचा निर्णय घेतला होता. उपविजेत्या प्यूरसेल आणि थॉमसन यांनी उपांत्य सामन्यात ग्रेनोलर्स आणि झेबालोस यांचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत प्यूरसेल आणि थॉमसन यांनी टायब्रेकरमधील पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होती. पण त्यानंतरच्या पुढील दोन्ही टायब्रेकर सेट्समध्ये पॅटेन आणि हेलिओव्हेरा दर्जेदार खेळ करत विजेतेपद हस्तगत केले. पुरुष दुहेरीच्या प्रकारात पॅटेन आणि हेलिओव्हेरा ही जोडी टेनिस शौकिनांना नवखी ठरली.