कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अर्थपूर्ण स्वातंत्र्याकडे...

06:30 AM Aug 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय स्वातंत्र्यदिन आपण देशाच्या राजकीय स्वातंत्र्याचा महत्त्वाचा, आनंदाचा व अभिमानाचा टप्पा म्हणून साजरा करीत असताना आपण वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवर हे स्वातंत्र्य अर्थपूर्णरित्या कितपत उपभोगत आहोत हे महत्त्वाचे ठरते. गेल्या आठ दशकात भारताने आर्थिक क्षेत्रात लक्षणीय झेप घेतली असून जागतिक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर पोहचलो आहोत. ही प्रगती वेगवान पद्धतीने साध्य होत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या संधी जे घेऊन आपली प्रगती साध्य करतात त्यांना अर्थपूर्ण स्वातंत्र्य उपभोगता येते. उलट जे असे साध्य करू शकत नाहीत. त्यांना दारिद्र्या, परावलंबन पत्करावे लागते. जर प्रत्येक कुटुंबाने व कुटुंबातील प्रत्येकाने ‘अर्थसाक्षरता’ व अर्थनियोजन स्वीकारले तर आर्थिक स्वातंत्र्याकडे निश्चितपणे वाटचाल करता येते. हा आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास करीत असताना त्यातील महत्त्वपूर्ण टप्पे व संभाव्य चकवे/फसवे हेही समजून घेणे आवश्यक ठरते.

Advertisement

कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात प्रथम आपण सध्या कुठे आहोत? आपली नजिकची व दीर्घकालीन उद्दिष्टे कोणती हे ठरवावे लागेल. यासाठी प्रथम कुटुंबात येणारे उत्पन्न व खर्च घटक समजून घ्यावे लागतात. कुटुंबात येणारे उत्पन्न अनेक मार्गी व स्थिर असेल तर आर्थिक अडचणी कमी येतात. उलट उत्पन्न एकमार्गी, अनियमित असल्यास आर्थिक आपत्ती केव्हाही येऊ शकतात. येणारे उत्पन्न खर्च करीत असताना प्रथम 25 ते 40 टक्के बचतीसाठी बाजुला ठेऊनच उर्वरीत  उत्पन्न खर्चासाठी वापरण्याचा सुवर्ण नियम वॉरेन बफे यांनी सुचवला आहे.

Advertisement

खर्चामध्ये आवश्यक व तातडीच्या खर्चाव्यतिरिक्त असणारे पुढे ढकलता येणारे, रद्द करता येणारे खर्च हे उत्पन्न वाढीचे छुपे मार्ग असतात. पण केवळ बचत करून चालणार नाही. केलेली बचत शहाणपणाने, योग्य साधनात गुंतवणे तेवढेच महत्त्वाचे ठरते. हे पैशाला कामाला लावण्याचे सूत्र आहे. त्यासाठी प्रथम कोणताही गुंतवणुकीचा पर्याय हा तीन महत्त्वाच्या निकषांवर तपासला पाहिजे. सुरक्षितता, रोखता व परतावा किंवा वाढ ही तीन गुंतवणुकीची महासूत्रे आहेत. आपली गुंतवणूक सुरक्षित असणे, न बुडणारी असणे यासाठी प्रथम प्राधान्य हवे. त्यासाठी मोठा व लवकर परतावा देणाऱ्या, आकर्षक वाटणाऱ्या पर्यायापासून सावधानता हवीच! आपली गुंतवणूक आपल्या वेळेस किंवा गरजेस काढता आली पाहिजे. ही गुंतवणूक तरलता नसल्यास असून खोळंबा होऊ शकतो. विशेषत: स्थावर मालमत्तेत (जसे घर, प्लॉट) ही अडचण येते. गुंतवणुकीवर मिळणारा परतावा व जोखीम तपासणे महत्त्वाचे असते. जर परतावा हा महागाई दरापेक्षा कमी असेल तर आपली संपत्ती वाढण्याऐवजी घटते, हे बऱ्याचदा विसरले जाते. बँका, पोस्ट ठेवी येथे व्याजदर जेमतेम महागाई दराएवढीच असल्याने हे पर्याय चांगले ठरत नाहीत. यातही व्याजावर जर कर द्यावा लागत असेल तर आणखी परतावा दर घटतो. सुरिक्षत, रोखता व परतावा असणारे परंतु जोखीम असणारे म्युच्युअल फंडासारखे पर्याय निश्चितच अधिक उपयुक्त ठरतात. लवकर व सातत्यपूर्ण केलेली  गुंतवणूक चक्रवाढ पद्धतीने वाढवणे हे संपन्नतेचे सूत्र आहे.

आर्थिक संवाद महत्त्वाचा

कुटुंबातील प्रत्येक घटकास आपल्या कुटुंबाचे अर्थकारण परिचित असले पाहिजे. किमान आणखी एका जबाबदार सदस्यास कुटुंबाची मालमत्ता, देयता व त्याबाबतची  कागदपत्रे, व्यवहारपद्धती, पासवर्ड हे सर्व माहित असावे. शक्यतो मुख्य बँक खाते संयुक्त असावे. त्यामुळे महत्त्वाचे, तातडीचे खर्च करण्यात अडचण येत नाही. बँक खाते, लॉकर यांचा वापर केवळ एकट्याच्या अखत्यारित ठेवणे अडचणीस कारण ठरू शकते. सर्व महत्त्वाची कागदपत्रे, त्यांच्या नोंदी तसेच वारसा नोंद स्पष्टपणे केलेली असणे व त्या अद्यावत करणे हे काम निदान वर्षातून एकवेळ केले तर अनेक अडचणी व नुकसान टाळणे शक्य होते. मोठे आर्थिक निर्णय घेताना कौटुंबिक संवादासोबत तज्ञ, प्रशिक्षित व अधिकृत व्यक्ती अथवा संस्थांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. आपल्या कुटुंबात पुरेसा विमा असणे हे आपत्ती कवच अनेकदा दुर्लक्षित राहते.

आरोग्य विमा हा वाहन विमा इतकाच महत्त्वाचा असून तो नसल्यास एखादे मोठे आजारपण सर्व बचत शून्य करू शकते. विमा घेताना त्याच्या अटी समजून घेणे आवश्यक असते. अन्यथा फसगत होण्याचा धोका असतो. विविध शासकीय योजना माहित नसल्याने आपण त्याच्या लाभापासून दूर राहतो. त्याबाबतची अद्यावत माहिती, अटी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेणे योग्य ठरते. अनधिकृत कॉल, वॉटस अॅपचे संदेश हे फेसबुकचे जाळे असते. त्यापासून सावधानता हवी.

अज्ञानाची किंमत 2 लाख कोटी?

भारतीय लोकांचे योग्य माहिती नसल्याने, वारस नोंद अपूर्णता, अज्ञान यामुळे बँका, विमा कंपन्या, मुच्युअल फंड यामध्ये 2 लाख कोटी पडून आहेत. यामध्ये दरवर्षी वाढ होत असून त्याबाबत एक महत्त्वपूर्ण योजना, ‘उद्गम UDGAM'हाती घेण्यात आली आहे. बँकामधून 2020 मध्ये 25 हजार कोटी पडून होते ते एका वर्षात 6 हजार कोटीने वाढले. त्याचबरोबर पेन्शन खात्यावरही पडून असणारी रक्कम, विमा देय रक्कम न घेतलेली अशा विविध ठिकाणी असणारे 5 वर्षापूर्वीचे 82 हजार कोटी आता 2 लाख कोटीची मर्यादा पार केली आहे. याला अज्ञानाची, माहिती अभावाची किंमत मानावी लागेल. अशा प्रकारे जर 7 वर्षे अथवा 10 वर्षे रक्कम पडून राहिली तर ते ठेवीदार शिक्षण व जागरुकता निधी (DEAF-Depositors Education & Awareness Fund) अथवा  गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (Investors Education Fund) यामध्ये हस्तांतरित केला जातो. सेबी मार्फत व रिझर्व्ह बँकेमार्फत जागृत करणाऱ्या कार्यशाळा सातत्याने घेतल्या जात आहेत.

उदगम (UDGAM) योजना

ज्यांचे बँकेत, विमा कंपनीत अथवा प्रॉव्हिडंड फंड/पेन्शन खाते यात पैसे अडकले असतील त्यांच्याकरिता Deposits Gateway Information UDGAM उद्गम ही योजना 2023 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत सुमारे आठ लाख अडुसस्ट हजार लोकांनी फायदा घेतला असून आपणही याचा लाभ घेऊ शकता. ‘उद्गम’ अंतर्गत आपली रक्कम ज्या बँकेत अथवा संस्थेत असेल तेथे आपला तपशील जसे आधार, पॅन, इ. दिल्यानंतर जर देय रक्कम असेल तर UDRN हा नोंद क्रमांक मिळतो. त्या आधारे उद्गम यंत्रणेमार्फत आपण रक्कम प्राप्त करू शकतो.

बदलते अर्थरंग

पारंपरिक  कुटुंबप्रणाली, उत्पन्नाचे खात्रीचे मार्ग यात आमुलाग्र बदल होत असून प्रत्येकास स्वावलंबन व अर्थस्वातंत्र्य अपरिहार्य होत आहे. फक्त 20 टक्के ज्येष्ठ नागरिक अर्थसुरक्षित असून उर्वरीत 80 टक्के ज्येष्ठ नागरिक आर्थिक परावलंबन व त्यातून येणाऱ्या अडचणींना तोंड देत आहेत. आपल्या भवितव्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे व टिकवणे यासाठी प्रत्येकाने अर्थपूर्ण नियोजन करणे हाच आर्थिक स्वातंत्र्याचा पाया ठरतो!

प्रा. डॉ. विजय ककडे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article