महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘बुक कॅपिटल’च्या दिशेने...

06:09 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘नॅशनल बुक ट्रस्ट’ अर्थात ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’च्या वतीने पुण्यात आयोजिलेल्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’ला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्वच म्हटला पाहिजे. या महोत्सवात तब्बल साडे आठलाख प्रतींची विक्री झाली असून, तब्बल 11 कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते. आठवडाभर सुरू असलेल्या या महोत्सवास साडे चार लाख वाचनप्रेमी भेट देतात, अगदी विद्यार्थी, युवांपासून ते महिला, वृद्धांपर्यंत विविध वयोगटातील नागरिक तुडुंब गर्दी करतात नि आपल्या आवडत्या विषयातील पुस्तके खरेदी करतात, हे चित्र खरोखरच सुखावह होय. एरवी आपण वाचन संस्कृती धोक्यात आल्याची ओरड नेहमीच करत असतो. युवा पिढी वाचत नाही, त्यांना वाचनामध्ये स्वारस्यच नाही, ही मांडणी तर सर्रास केली जाते. त्यात ऑनलाईन वा तत्सम माध्यमांकडे आजच्या तऊणाईचा कल असल्याने युवा वर्ग पुस्तके वाचतच नाहीत, असा निष्कर्ष काढून आपण मोकळे होतो. प्रत्यक्षात तो किती चुकीचा आहे, हे पुणे पुस्तक महोत्सवातून अधोरेखित झालेले दिसते. ‘बुक फेस्टिव्हल’ला सर्वांत जास्त कुणाचा प्रतिसाद मिळाला असेल, तर तऊण वाचकांचा. हे दिलासादायकच ठरावे. अ. भा. मराठी साहित्य संमेलनातही पुस्तकांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. तथापि, एखाद्या शहरास फिरून परत संमेलनाच्या यजमानपदाचा मान मिळण्याचा कालावधी खूप मोठा असतो. हे पाहता ‘पुस्तक महोत्सव’ ही वाचकांसाठी पर्वणीच ठरावी. तशी पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. पुस्तकाची सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून अप्पा बळवंत चौक परिसराचा उल्लेख करण्यात येतो. कुठलेही पुस्तक अप्पा बळवंत चौकात हमखास मिळेल, याची खात्री बाळगली जाते. त्यात पुस्तक प्रदर्शनासारखे उपक्रम पुण्यात सुरूच असतात. या काळातही नवी, जुने पुस्तके विकत घेण्याची संधी वाचकांना मिळते. त्यामुळे आणखी दुसऱ्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त काय साधणार, असा प्रश्न कुणालाही पडावा. परंतु, एकाच मांडवाखाली भव्यदिव्य स्वऊपात असा उत्सव भरविणे, त्याचे उत्तम मार्केटिंग करणे, त्याला विविध साहित्यविषयक कार्यक्रमांची जोड देणे व याउपर सगळ्या प्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिल्यावर त्याला कसा भरभरून प्रतिसाद मिळू शकतो, हे यातून सिद्ध झाले आहे. अर्थात याचे श्रेय महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांना द्यायला हवे. पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने पुस्तकाचा हा महामेळा घडवून आणला व महाराष्ट्राच्या ग्रंथविश्वात एकप्रकारची ऊर्जा आणली, ते कौतुकास्पदच ठरते. भविष्यात पुणे ही जागतिक पुस्तक राजधानी होण्यासाठी पुणे महापालिकेसोबत प्रयत्न करणार असून, ‘नॅशनल बुक ट्रस्ट’चे एक केंद्र पुण्यात स्थापन करण्याबाबतही पाठपुरावा करणार असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे. याद्वारे वर्षभर विविध उपक्रम, कार्यशाळा, चर्चासत्रे घेऊन पुणे पुस्तकमय करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तो समयोचितच म्हणता येईल. पुणे आणि पुस्तके, हे दोन्ही समानार्थीच शब्द ठरावेत, इतके या दोहोंचे परस्परांशी घट्ट नाते आहे. आजही अनेक प्रकाशन संस्थांची कार्यालये पुण्यात आहेत. रोज कितीतरी पुस्तके पुण्यातून प्रकाशित होतात. एखाद्या पुस्तकाच्या शोधासाठी जिज्ञासू वाचकांची पावले पुढे पडतात, ती पुण्याच्या दिशेनेच. वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा, वाद, मतमतांतरे, या गोष्टी पुण्यासाठी वा पुणेकरांसाठी नव्या नाहीत. मात्र, अशा शहराचे ब्रँडिंग ‘जागतिक पुस्तक राजधानी’ म्हणून करण्याची संकल्पना स्तुत्यच. त्यातून पुण्याच्या पुस्तक बाजारपेठेला एक वैश्विक रूप मिळेल व त्याचा शहराला नक्कीच लाभ मिळू शकतो. आगामी काळात अशा प्रकारचे महोत्सव वेगवेगळ्या शहरांत घेण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. तसे झाले, तर वाचनप्रेमींसाठी सुवर्णसंधी असेल. एकेकाळी साहित्याचे वर्तुळ बव्हंशी पुण्यामुंबईपुरते सीमित असायचे. आता ही परिस्थिती बदलली आहे. सकस, दर्जेदार व अभिजात मूल्य असलेल्या साहित्याची निर्मिती खेड्यापाड्यातूनच होताना पहायला मिळते. याशिवाय पट्टीचा वाचक वा सखोल वाचन करणारे ग्रंथप्रेमीही बव्हंशी ग्रामीण भागात दिसून येतात. हे पाहता कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, मराठवाडा व विदर्भातील वेगवेगळ्या शहरांतही अशा प्रकारचे महोत्सव भरविण्यास हरकत नसावी. त्यातून वाचन संस्कृतीबरोबरच साहित्य चळवळीलाही चालना मिळेल.  महोत्सवास भाजपातील वरिष्ठ नेत्यांपासून ते काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भेट दिल्याचे पहायला मिळाले. वाचनातून मानवी मनाची घडण होते, वाचनाशिवाय पर्याय नाही, असाच या साऱ्यांचा सूर होता. कवी कुमार विश्वास यांनी तर वाचन हा जगण्याचा आत्मा असल्याचे म्हटले. ते खरेच. वाचनातून मानवी मनाची मशागत होते. संस्कार होतात. म्हणूनच वाचनासाठी प्रत्येकाने थोडातरी वेळ काढायला हवा. उमलत्या वयातील मुलांसाठी तर वाचन ही महत्त्वपूर्ण गरज ठरावी. मागच्या काही वर्षांत मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये अनेक वर्तन समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यापासून आपल्या मुलांना दूर ठेवायचे असेल, तर मुलांना वाचनाची गोडी लावावी लागेल. मराठीत साने गुऊजींनी मुलांकरिता अतिशय सकस व विपुल असे संस्कार साहित्य लिहिले. या साहित्यातून अनेक पिढ्या घडल्या. असे साहित्य हीदेखील काळाची गरज ठरते. कोणताही इव्हेंट यशस्वी करण्यात शतप्रतिशतवाले वाकबगार आहे. आपल्या या कौशल्याचा वापर करून त्यांनी पुस्तक महोत्सवही तडीस नेला, याबद्दल ते अभिनंदनास पात्र ठरतात. महोत्सवात ‘साधना प्रकाशन’च्या वतीने आयोजिलेल्या ‘पक्षी उन्हाचा’ या पुस्तकाविषयीच्या चर्चेचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने काहीसा वाद झाला होता. त्यावरून दावे-प्रतिदावे करण्यात आले. मुळात ग्रंथविश्व हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे. त्यामुळे असे कोणतेही वाद या मंचावर होऊ नयेत, याची दक्षता भविष्यात घेतली गेली पाहिजे. त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article