For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुक्केरीमधील पर्यटकांना गोवा हद्दीत मारहाण

12:00 PM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
हुक्केरीमधील पर्यटकांना गोवा हद्दीत मारहाण
Advertisement

सुरल धबधबा पाहण्यास गेले असता राक्षसी कृत्य : मारहाणीनंतर तऊणांकडून लिहून घेण्याचा प्रकार

Advertisement

बेळगाव : धबधबा बघण्यासाठी गेलेल्या बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरीच्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सुरल धबधब्याजवळ ही घटना घडली असून पर्यटकांना झालेल्या मारहाणीमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. गोवा सरकारचे वनाधिकारी व कर्मचारी असल्याचे सांगून पाच तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीमुळे या तरुणांच्या अंगावर वळ उठले आहेत. बहुतेक सर्वजण विद्यार्थी आहेत.ते अधिकाऱ्यांच्या दादागिरीला घाबरून गेले आहेत. मारहाणीनंतर त्या तरुणांकडून ‘आम्ही कोठे तक्रार करणार नाही’, असे लिहून सह्या घेण्याचा प्रकारही घडला आहे.

लाठ्यांनी तरुणांना मारहाण

Advertisement

उपलब्ध माहितीनुसार संकेश्वर व परिसरातील पाच जण रविवारी सुरल धबधबा बघण्यासाठी गेले होते. अधिकाऱ्यांनी धबधब्याजवळ त्यांना अडविले. पुढे प्रवेश नाही का? असे विचारल्यानंतर आम्ही किती जणांना सांगू? असा प्रश्न तथाकथित अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. याच मुद्द्यावरून वादावादी झाली. वादावादीनंतर पाच जणांनी मिळून लाठ्यांनी तरुणांना बदडून काढले.

एकाने अबकारी अधिकाऱ्यांना सांगितला घडला प्रकार

एका तरुणाला तर काही तासांसाठी आपल्याकडे ठेवून घेतले होते. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी गावात जाऊन काही ज्येष्ठ नागरिकांकडे मदतीची याचना केली. गावकरीही या तरुणांना मदत करण्यासाठी पुढे आले. गावकऱ्यांना घेऊन का आलात? अशी विचारणा करीत पुन्हा मारहाण करण्यात आली आहे.यातील एक विद्यार्थी स्वत:ची सुटका करून घेऊन कर्नाटकाच्या हद्दीतील अबकारी तपास नाक्यावर पोहोचला. त्याने घडला प्रकार अधिकाऱ्यांना सांगितला.आता प्रकरण वाढणार,हे लक्षात येताच या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली असून त्यांना सोडून देण्याआधी आम्ही या मारहाणीबद्दल कोठेही तक्रार करणार नाही, असे एका कागदावर लिहून घेऊन त्यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. मारहाणीचे व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले असून या राक्षसी प्रवृत्तीच्या तथाकथित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.