For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दूधसागर धबधबा पर्यटकांना पाहावा लागतोय धावत्या रेल्वेतूनच

11:25 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
दूधसागर धबधबा पर्यटकांना पाहावा लागतोय धावत्या रेल्वेतूनच
Advertisement

वार्ताहर /रामनगर

Advertisement

गोवा-कर्नाटक सीमेलगत असणारा, पश्चिम घाटात कर्नाटक सीमेतून बहरून गोवा सीमेत कोसळणारा दूधसागर धबधबा बहरला आहे. परंतु याचा आनंद घेण्यासाठी बंदी असल्याने पर्यटक धावत्या रेल्वेतून आपल्या मोबाईलद्वारे चित्रफीत काढत आहेत. एकेकाळी दूधसागर धबधबा पाहण्यासाठी शनिवार, रविवारी पाच-सहा हजार पर्यटक येत होते. परंतु परतीच्या प्रवासावेळी त्यांना दूधसागर स्थानकावर ट्रेनमध्ये चढणे शक्य नसल्याने रेल्वेच्या एसी डब्यांच्या ग्लास फोडून जागा बळकावण्याचे प्रकार होत होते. वारंवार शनिवारी-रविवारी असे घडत असल्याने रेल्वेला फार मोठे नुकसान सहन करावे लागत होते. शेवटी नाईलाजाने रेल्वे विभागाने दूधसागर धबधबा पाहणे पर्यटकांसाठी बंद केले होते.

त्यानंतर काही वर्षांपूर्वी पुन्हा रेल्वे विभागाने बेळगाव-वास्को लोकल ट्रेन सुरू करून पर्यटकांना धबधबा पाहण्यास खुला केला होता. मात्र, आता पुन्हा गेल्या काही वर्षांपासून पूर्णत: पर्यटकांना दूधसागरचे दर्शन बंद करण्यात आले असून एखादा पर्यटक या रेल्वे स्थानकावर उतरल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. धबधबा पाहण्यास बंदी असतानाही नुकतेच रविवारी दूधसागर धबधबा पाहण्यासाठी आलेल्या 25 पर्यटकांना प्रत्येकी 1000 ऊपये दंड तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटक आता धावत्या ट्रेनमधूनच मोबाईलमध्ये व्हिडिओ तसेच फोटो काढत आपला आनंद द्विगुणित करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.