महापालिकेत मराठीचा मुद्दा गाजला
सुमार भाषांतरणामुळे जोरदार आक्षेप : नगरसेवक रवी साळुंखे यांची आक्रमक भूमिका
बेळगाव : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची माहिती मराठीत देताना भाषांतरणाच्या भरमसाट चुका होत्या. महापौरांऐवजी थेट राष्ट्रपतींच्या नावाचा उल्लेख विषय पत्रिकेत करण्यात आल्याने मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच मराठीचा मुद्दा गाजला. सुमार भाषांतर करण्यात आल्याने मराठी गटाचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी आक्षेप घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. नेहमीच मराठीवर अन्याय खपवून घेणार नाही, असे सुनावताच अधिकाऱ्यांनीही नरमाईची भूमिका घेतली. महानगरपालिकेची सर्वसाधारण सभेची पूर्वसूचना देण्यासाठी मराठी भाषिक नगरसेवकांना मराठीतून विषयपत्रिका देण्यात आली. कन्नड विषयपत्रिका भाषांतर करून ती मराठी नगरसेवकांना देण्यात आली होती. या विषयपत्रिकेत चुका होत्या. नगरसेवकांऐवजी शहरसेवक, महापौरांऐवजी राष्ट्रपतींचा उल्लेख होता. थेट देशाच्या राष्ट्रपतींचा उल्लेख झाल्याने रवी साळुंखे यांनी आक्षेप घेत अधिकाऱ्यांना सुनावले.
अनुवादक नेमण्याची मागणी
महापालिकेत कन्नडसह मराठी व उर्दू भाषिक नगरसेवक आहेत. कन्नडमध्ये विषयपत्रिका दिल्यास इतर भाषिकांना समजून येत नाही. त्यामुळे मराठी व इंग्रजीमध्ये विषयपत्रिका तयार करण्यासाठी अनुवादकाची नेमणूक करण्याची मागणी विरोधी गटातील नगरसेवकांनी केली. तसेच विरोधी गटाचे गटनेते मुजम्मील डोणी यांनी अशा प्रकारच्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची खबरदारी घेऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली.
मराठी नगरसेवकांकडूनच बगल देण्याचा प्रयत्न
रवी साळुंखे यांनी सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीपासूनच मराठीचा मुद्दा लावून धरला. यामुळे काहीकाळ महापालिकेत गदारोळ झाला. नेहमीच मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक दिली जाते. असे न करता विषयपत्रिकेची खातरजमा करूनच ती नगरसेवकांना द्यावी, अशी मागणी साळुंखे यांनी केली. या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटातील एका मराठी भाषिक नगरसेवकाने केला. जाणीवपूर्वक ही चूक झालेली नसेल असे सांगून अधिकाऱ्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न झाला. एकवेळ कन्नड भाषिक नगरसेवकांनी आक्षेप घेतला असता तर वावगे ठरले नसते. परंतु मराठी भाषिक नगरसेवकानेच मराठीच्या गळचेपीची भूमिका घेतल्याने नाराजीचा सूर उमटला.