सेल्फीच्या नादात पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू
गोकर्ण जवळच्या ओम बीचवरील घटना
कारवार : सेल्फीच्या नादात पाय घसरुन समुद्रात पडलेला पर्यटक जीव गमावून बसल्याची दुर्घटना शुक्रवारी गोकर्ण जवळच्या ओम बीचवर घडली. जीव गमावून बसलेल्या पर्यटकाचे नाव अस्लम (वय 45, रा. शिमोगा) असे आहे. तो पेशाने गुड्स ऑटोचालक होता, असे सांगण्यात आले. शिमोगा येथील 10 पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गोकर्ण जवळच्या सुप्रसिद्ध ओम बीचवर दाखल झाले होते. बीचवरील एका धोकादायक ठिकाणी सर्वजण सेल्फी घेण्यात व्यस्त झाले होते. त्यावेळी अस्लम सेल्फीच्या नादात असताना पाय घसरुन समुद्रात पडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक होडीद्वारे अस्लमचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान प्रभाकर अंबीग, हरिश मांडगी आणि मंजेश हरिकंत्र हे जीवरक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अस्लमचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पुढे मृतदेह गोकर्ण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आला. गोकर्ण पोलीस अधिक तपास करीत आहेत.