पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची केंद्रीय पर्यटनमंत्र्यांशी चर्चा
पर्यटन, सांस्कृतिक प्रोत्साहनावर दिला भर : विमान वाहतूकमंत्र्यांचीही घेतली भेट
पणजी : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन आणि संस्कृतीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेतली. या भेटीत खंवटे यांनी गोव्याच्या पर्यटन विकासासाठी सहयोगी धोरणे विकसित करण्याभोवती चर्चा केली. याशिवाय पायाभूत सुविधा, सांस्कृतिक प्रोत्साहन आणि विमान वाहतूक कनेक्टिव्हिटीवरही भर देण्यात आला. दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्याला प्रामाणिक आणि उच्च-मूल्याच्या पर्यटनाचे केंद्र म्हणून स्थान देण्यासाठी गोव्याचा वारसा, उत्सव आणि आध्यात्मिक संपत्तीचा वापर करण्यास प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले. गोव्याची ओळख प्रतिबिंबित करणाऱ्या पायाभूत सुविधा विकसित करण्याचे महत्त्व, यावर चर्चा करण्यात आली.