गोव्याची पर्यटन ओळख राखावी
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे आवाहन : शॅकधारकांच्या मागणीनुसार शॅक वाटप लवकर
पणजी : पर्यटन हा गोव्याचा कणा, मुख्य उद्योग असून सर्व गोमंतकीय गोव्यातील पर्यटनाचे दूत आहेत. यंदा शॅक वाटप वेळेवर सुरू होईल. आम्ही नवीन शॅक धोरणामध्ये गतवर्षीप्रमाणेच दर ठेवले आहेत. शॅकधारकांनी स्वत:च्या आव्हानांना सामोरे जाऊन गोव्याची ओळख कायम पुढे ठेवली आहे. मायकल लोबो हे नेहमीच पाठिंबा देत आले असून मी त्यांना आणि सर्व शॅकमालकांना या वर्षीच्या हंगामासाठी शुभेच्छा देतो. यंदा पर्यटकांना शॅकची वाट पहावी लागणार नाही, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पणजीत दिली.
शॅक वाटप लवकर झाल्याचे कौतुक करताना कळंगुट मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले की, यावर्षी शॅकचे वाटप सप्टेंबरपर्यंत करावे आणि ऑक्टोबरपर्यंत शॅक कार्यान्वित करावे, जेणेकरून परदेशी पर्यटक राज्यात येताच वाळूवर डेक बेडचा आनंद घेऊ शकतील, अशी मागणी सर्व किनारी आमदार आणि शॅकमालकांची होती. मंत्री खंवटे यांनी विधानसभेत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी वैयक्तिकरित्या सर्व विभागांशी समन्वय साधला आणि इतिहासात प्रथमच आम्हाला एक खिडकीने मंजुरी मिळाली आहे, असेही आमदार लोबो म्हणाले.
पर्यटनक्षेत्रासाठी एक सकारात्मक वाटचाल करताना कळंगुट मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो आणि शॅक संघटनेच्या सदस्यांनी या हंगामात शॅकचे वाटप लवकर केल्याने पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. गोव्यात किनारपट्टीच्या पर्यटनाचे वैशिष्ट्या असलेल्या शॅकचे वाटप वेळेच्या अगोदर करण्यात आले आहे, जेणेकरून ते पर्यटन हंगामापूर्वी चांगले कार्यान्वित होतील. हे पाऊल राज्यात पर्यटकांच्या ओघासाठी, विशेषत: हंगामात लवकर येणाऱ्या पर्यटकांना सेवा पुरविण्याच्या तयारीसाठी पूरक ठरणार आहे. शॅकमालक व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मंत्री खंवटे यांची भेट घेऊन शॅक वाटपाचा निर्णय वेळेत घेतल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.