गोमंतक भंडारी समाजाचा वाद चिघळला
छाननीच्यावेळी विरोधकांचे अर्ज ठरवले बाद : देवानंद नाईक गटाची कार्यकारिणी जाहीर, जिल्हा निबंधकाकडून निवडणुकीला स्थगिती
पणजी : गोमंतक भंडारी समाजाच्या निवडणुकीतील अर्जांची छाननी काल सोमवारी झाली. मात्र विरोधकांचे अर्ज बाद ठरवून फेटाळण्यात आल्याने समाजातील वाद आणखी चिघळला आहे. विरोधकांनी निवडणूक अधिकाऱ्यावर आरोप करत जिल्हा निबंधकांकडे न्याय मागितला. जिल्हा निबंधकांनी या निवडणुकीला स्थगिती दिली असून पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान देवानंद अर्जून नाईक गटाने निबंधकांचा आदेश आपणास मिळाला नसल्याचे सांगून आपल्या गटाची बिनविरोध निवड झाल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत भंडारी समाजाच्या कार्यालयाबाहेर तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे दिवसभर निवडणूकस्थळी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला.
विरोधकांचे अर्ज फेटाळले
निवडणूक अधिकारी म्हणून रामदास पेडणेकर हे काम पाहत होते. त्यांनी अर्जांच्या छाननीत विरोधकांचे अर्ज फेटाळले. उपेंद्र गावकर यांच्या गटाने त्यास जोरदार हरकत घेतल्याने तणाव निर्माण झाला. समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांचा गट पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे सत्तेत येऊ पाहात आहे. त्यासाठी साध्या-साध्या कारणांवऊन आमचे अर्ज बाद ठरवले असून त्याविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचा इशारा गावकर यांनी दिला आहे.
विरोधक न्यायालयात जाणार
निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. बार्देश, सांगे, मुरगाव व फोंडा या तालुक्यातील लोक सत्ताधारी गटाबरोबर असल्याच्या वल्गना अशोक नाईक करत आहेत. मात्र ते चुकीचे असून या निवडणुकीत लोक आमच्याबरोबर राहतील. ते पुन्हा आम्हाला निवडून आणू पाहत आहेत. सदस्य नोंदणी क्रमांक तसेच नाव व्यवस्थित नसल्याच्या कारणांवरुन विरोधी गटाच्या सदस्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले, मात्र या अन्यायावर आम्ही गप्प राहणार नाहीत, असे गावकर यांनी सांगितले.
निवडणूक अधिकाऱ्यांवर आरोप
निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले रामदास पेडणेकर हे निवृत्त सरकारी कर्मचारी असून दोन महिन्यापूर्वीच ते समाजाचे सदस्य झाले आहेत. बेकायदेशीरपणे अध्यक्ष झालेले देवानंद नाईक यांचे ते मावसभाऊ आहेत. त्यामुळे उमेदवार असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करणे हे बेकायदेशीर आहे. शिवाय त्यांच्या विरोधात दक्षता विभागात तक्रारी आहेत. नाईक आणि त्याच्या गटने गेल्या सहा वर्षापासून समाजाचे कोट्यावधी ऊपये हडप केले आहेत. ते पचविण्यासाठी कुठल्याही स्थितीत अध्यक्षपदाची खूर्ची ते पुन्हा मिळवू पाहत आहेत, असा आरोपही गावकर यांनी केला.
देवानंद नाईक यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी
सत्ताधारी गटाचे नेते देवानंद नाईक यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत जाहीर केले की 2024-29 या वर्षासाठी देवानंद नाईक गट बिनविरोध निवडून आला आहे. निवडणूक समितीचे अध्यक्ष अॅड. रामदास पेडणेकर यांनी यावेळी सविस्तर निकाल जाहीर केला. देवानंद नाईक यांच्या अध्यक्षतेखालील गटाचा विजय झाल्याचे त्यांनी जाहीर केले. देवानंद नाईक यांच्या अध्यक्षतेखालील गटात कृष्णाकांत गोवेकर व विनय ऊर्फ शिरोडकर यांची उपाध्यक्षपदी, किशोर नाईक यांची सरचिटणीसपदी, संजय पर्वतकर व ऊपेश नाईक यांची संयुक्त सचिवपदी, मंगलदास नाईक यांची खजिनदारपदी तर अवधुत नाईक यांची संयुक्त खजिनदारपदी निवड झाली आहे. तसेच प्रकाश कळंगुटकर, दिलीप नाईक, विजय कांदोळकर, वासुदेव विर्डीकर, अमर नाईक शिरोडकर, कृष्णनाथ चोपडेकर, परेश नाईक, बाबू नाईक व विनोद नाईक हे कार्यकारी सदस्य म्हणून निवडून आले आहेत.