For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर जंगल भागातील गावांच्या स्थलांतरासाठी लवकरच दौरा

11:31 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर जंगल भागातील गावांच्या स्थलांतरासाठी लवकरच दौरा
Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती

Advertisement

बेळगाव : खानापूर तालुक्यातील जंगल भागातील गावांच्या स्थलांतरासाठी जिल्हा पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील जंगल भागात असणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतरासाठी चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी असणाऱ्या योजनेच्या माध्यमातून सदर स्थलांतर प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी लवकरच खानापूर तालुक्याचा दौरा करणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

या तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत. जंगल भागातील नागरिकांशी चर्चा करण्यात आली आहे. याबरोबरच लोकप्रतिनिधींबरोबरही चर्चा सुरू आहे. कारवार जिल्ह्यातील काळी व्याघ्र संरक्षित भागातील नागरिकांचे स्थलांतर करून त्यांची सोय करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच या भागातील नागरिकांशी चर्चा करून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन स्थलांतरासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Advertisement

जिल्हा पालकमंत्र्यांकडूनही वनमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. यापूर्वीच दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. पाऊस व इतर कारणांमुळे खानापूरचा दौरा होऊ शकला नाही. पाऊस कमी झाल्यानंतर आठवड्याभरात खानापूरचा दौरा करण्यात येणार आहे. स्थलांतरासाठी लागणारा निधी सरकारकडून मिळवून घेऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जवळपास 10 ते 12 कोटी रुपयांची आवश्यकता असून राज्य सरकारकडून मिळवून घेण्यात येईल. केंद्र सरकारकडून निधी देण्यात येत असला तरी यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जातो. तेथूनच निधी मंजूर केला जातो, असे त्यांनी सांगितले.

बॅचमेंट डीसींमुळे पूरस्थिती नियंत्रणास मदत...

जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणासाठी बॅचमेंट सहकारी असणाऱ्या कोल्हापूर जिल्हाधिकारी, सातारा जिल्हाधिकाऱ्यांची मदत मिळाली आहे. पाण्याची पातळी व परिस्थितीची माहिती वेळोवेळी मिळाल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यात मोठे सहकार्य मिळाले आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

पूरस्थिती नियंत्रणात...

जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. 36 बोट उपलब्ध असून आवश्यकता भासल्यास आणखी बोटींची व्यवस्था करू.

- जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

Advertisement
Tags :

.