लक्ष्य सेन, सात्विक-चिरागसाठी कठीण ड्रॉ
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा : प्रणॉयसमोरही कडवे आव्हान : सिंधूकडून दमदार कामगिरीची अपेक्षा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बुधवारी पॅरिसमध्ये 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी ड्रॉ जाहीर केला. या स्पर्धेत सात भारतीय खेळाडू मैदानात आहेत. तथापि, पुरुष एकेरीत भारताची आशास्थान असलेल्या लक्ष्य सेनला एचएस प्रणॉयसह कठीण ड्रॉ मिळाला आहे. लक्ष्यचा सामना अव्वलमानांकित चीनच्या शी युकीशी होणार आहे. याशिवाय, महिला एकेरीत पीव्ही सिंधू तर पुरुष दुहेरीत सात्विक-चिरागवर भारताची मदार असणार असेल.
सात्विक-चिरागवर मदार
पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग शेट्टी जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. दुसऱ्या फेरीत त्यांचा सामना मलेशियाच्या हरिहरन-रुबेन कुमार किंवा तैवानच्या लिऊ कुआंग हेंग-यांग पो हान यांच्यातील विजेत्याशी होईल. भारतीय जोडीची आगेकूच कायम राहिल्यास उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर मलेशियाच्या आरोन चिया-सोह वुई यिक यांचे आव्हान असू शकते. अर्थात, आतापर्यंत भारतीय जोडीने या जोडीविरुद्ध झालेल्या 14 पैकी 11 लढतींत विजय मिळविला आहे.
सिंधूकडूनही अपेक्षा
महिला एकेरीत पीव्ही सिंधूलादेखील पहिल्या फेरीत आव्हान नसेल. तिची गाठ बल्गेरियाच्या कालोयाना नालबांटोवाविरुद्ध होईल. पण, दुसऱ्या फेरीत तिला जागतिक क्रमवारीतील चीनची दिग्गज खेळाडू वांग झी यी हिचे आव्हान अपेक्षित आहे. मागील काही काळापासून सिंधूला एकही जेतेपद मिळवता आलेले नाही. यंदाच्या वर्षातील तिचा खराब फॉर्म पाहता चीनच्या वांग झीविरुद्ध तिला सरस खेळ करावा लागणार, हे मात्र निश्चित आहे.